विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

IND vs ENG 2nd Test: यजमान इंग्लंड (England) आणि भारत (India) यांच्यात मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर (Lords Cricket Ground) एकमेकांसमोर येणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे (Virat Kohli) लक्ष असेल. या कसोटी सामन्यात कर्णधार कोहली शतक झळकावून दोन वर्षांचा दुष्काळ संपवू शकतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. विराट गेल्या दोन वर्षांपासून कसोटी सामन्यात शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनाही या प्रतिष्ठित मैदानावर शतके करता आलेली नाहीत. या ऐतिहासिक मैदानावर गुरुवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत कोहलीने शतक ठोकले तर तो या दोन दिग्गजांच्या पुढे जाईल. कोहली गेल्या नऊ कसोटी सामन्यांच्या 15 डावांमध्ये शतक करू शकलेला नाही. नोव्हेंबर 2019 पासून तो तिहेरी अंक गाठण्याची तळमळ करत आहे. (IND vs ENG 2nd Test: शार्दूल ठाकूरच्या दुखापतीवर विराट कोहलीचा अपडेट, पाहा काय म्हणाला टीम इंडिया कर्णधार)

दरम्यान, कोहलीने आतापर्यंत लॉर्ड्स मैदानावर चार डावांमध्ये 65 धावा केल्या आहेत आणि 25 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. कोहली नॉटिंगहॅम येथे पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पहिल्या चेंडूवर बाद झाला. ऑस्ट्रेलियानंतर भारताला आता इंग्लंडमध्ये विजय मिळवून देण्यासाठी विराट मोठी धावसंख्या उभारण्यासाठी उत्सुक असेल. दुसरीकडे, सध्याच्या भारतीय संघात फक्त अजिंक्य रहाणेने लॉर्ड्सवर शतक झळकावले आहे. 2014 मध्ये भारताच्या 95 धावांच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि पहिल्या डावात 103 धावा लुटल्या. तसेच भारताच्या अव्वल सहा फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि रिषभ पंत पहिल्यांदा या मैदानावर कसोटी सामना खेळतील. लॉर्ड्सच्या मैदानावर सलग तीन शतके करण्याचा विक्रम दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर आहे. त्याने 1979 मध्ये 107 धावा केल्या आणि त्यानंतर 1982 मध्ये 157 धावा आणि 1986 मध्ये नाबाद 126 धावा ठोकल्या.

दुसरीकडे, क्रिकेटचा मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक स्टेडियमवर महान गावस्कर आणि तेंडुलकर यांनाही शतक लावता आले नाही. गावस्करने या मैदानावर 10 डावांमध्ये दोन अर्धशतकांसह 340 धावा केल्या आहेत. शिवाय, सचिनने नऊ कसोटी डाव खेळले आहेत, पण त्याला या मैदानावर एकही अर्धशतक करता आले नाही.