IND vs ENG 2nd Test Day 2: मोहम्मद सिराजने इंग्लंडला दोन चेंडूत दिले दोन झटके, पुनरागमन करणारा घातक फलंदाज शून्यावर माघारी (Watch Video)
मोहम्मद सिराज (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 2: लॉर्ड्स (Lords) येथे इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा (Team India) 364 पहिला डाव 364 धावांवर संपुष्टात आला, त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडकडून रॉरी बर्न्स आणि डॉमनिक सिब्लीने (Dom Sibley) डावाची सुरुवात केली. त्यांनी दुसरे सत्र संपेपर्यंत संयमी फलंदाजी करत विकेट जाऊ दिली नाही. पण दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) सलग दोन चेंडूंवर यजमान ब्रिटिश संघाला दोन झटके दिले. सिराजने इंग्लंडच्या डावातील 15व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर सिब्ली 11 धावांवर केएल राहुलकडे झेलबाद केले तर त्याच्या पुढच्याच चेंडूवर सराव सामन्यात शतक करणारा हसीब हमीदचा (Haseeb Hameed) सिराजने त्रिफळा उडवला आणि त्याला पॅव्हिलियनमध्ये पाठवले. यामुळे इंग्लडची अवस्था 15 षटकांत 2 बाद 23 धावा अशी झाली. (IND vs ENG 2nd Test: डेब्यू सामन्यात टीम इंडियाला दिला त्रास, मग दुखापतीने करिअरला लावले ग्रहण, आता 5 वर्षांनी इंग्लंड संघात परतला ‘हा’ धुरंधर)

सिराजने भारताविरुद्ध कसोटी सामन्यात दणदणीत शतकी खेळी करणाऱ्या हसब हमीदला पहिल्याच चेंडूवर भोपळा फोडू न देता पॅव्हिलियनमध्ये पाठवले. 2016 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करणारा हमीद दुखापतीमुळे इंग्लंड संघातून बाहेर बसला होता. पण काऊंटी इलेव्हनकडून सराव सत्रात शतकीय खेळीने ब्रिटिश कसोटी संघात पुनरागमन करून दिले. पण कसोटी कमबॅकच्या पहिल्या डावात हमीद ठसा उमठवण्यात अपयशी ठरला. दरम्यान, दोन्ही संघातील नॉटिंगहम येथील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 सत्रातील पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.

दुसरीकडे, भारताचा पहिला 364 धावांवर संपुष्टात आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात भारतीय फलंदाजांनी दणक्यात केली. पहिल्या डावात केएल राहुलने 129 धावांची शतकी खेळी केली. तर रोहित शर्माने 83 धावांची महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. तसेच विराट कोहलीने 42, रविंद्र जडेजाने 40 आणि रिषभ पंतने 37 धावांचे छोटेखानी योगदान दिले. याशिवाय, इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तर ऑली रॉबिन्सन आणि मार्क वूडने प्रत्येकी 3 विकेट्स काढल्या. तसेच मोईन अलीला 1 विकेट मिळाली.