हसीब हमीद (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 2nd Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) दरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.  ब्रिटिश संघ तीन बदलांसह सामन्यात उतरला आहे. ज्यात एक खेळाडू आहे ज्याने पाच वर्षांनी संघात पुनरागमन केले आहे. भारताविरुद्ध लॉर्ड्सवर (Lords) होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हसीब हमीदला (Haseeb Hameed) इंग्लंड संघात सामील करण्यात आले आहेत. सलामीवीर हमीदने आतापर्यंत इंग्लंडसाठी तीन कसोटी सामने खेळले आहेत आणि ते देखील भारताविरुद्ध भारतात खेळले आहेत. त्यांनतर तो संघाबाहेर पडला होता पण आता तो संघात परतला आहे. आपल्या पहिल्याच कसोटीत हमीदने जबरदस्त कामगिरी करत अर्धशतक झळकावले. (IND vs ENG 2nd Test Day 1: लॉर्ड्स सामन्यात पावसाची एन्ट्री, 19व्या ओव्हरमध्येच सामना थांबला; लंचपर्यंत भारत 46/0)

हमीदने 9 ते 13 नोव्हेंबर 2016 दरम्यान राजकोट येथे खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडसाठी पदार्पण केले. या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. पहिल्या डावात हमीदच्या 31 धावाच करू शकला होता, पण दुसऱ्या डावात हमीदने महत्त्वपूर्ण 82 धावा केल्या आणि इंग्लंडला सामना ड्रॉ करण्यात मोठी भूमिका बजावली. यादरम्यान त्याने इंग्लंडचा तत्कालीन कर्णधार अॅलिस्टर कुकसोबत पहिल्या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी देखील केली. त्यावेळी हमीद फक्त 19 वर्षांचा होता. हमीदने आतापर्यंत इंग्लंडसाठी तीन सामन्यांत एकूण 219 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 43.80 होती. त्याने तीन सामन्यांच्या कारकिर्दीत दोन अर्धशतके ठोकली आहेत. आता हमीद भारतासाठी धोकादायक ठरू शकतो.

हसीब फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगली फलंदाजी करतो. राजकोट कसोटीत त्याने रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अमित मिश्रा या त्रिकुटासमोर दोन्ही डावांमध्ये 259 चेंडू खेळले. तसेच गेल्या महिन्यात हमीदने सराव सामन्यात भारताविरुद्ध काउंटी सिलेक्ट 11 साठी 112 धावा काढल्या होत्या. त्याचा डाव या कारणाने महत्त्वाचा होता कारण त्याने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जडेजा, शार्दुल ठाकूर सारख्या घातक भारतीय गोलंदाजांसमोर शतक ठोकले होते. हमीदने पाच वर्षांपूर्वी भारताविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीची प्रभावी सुरुवात केली होती, परंतु बोटाच्या फ्रॅक्चरमुळे तो संघातून बाहेर पडला आणि त्याचा फॉर्म खराब झाला.