इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी ऐतिहासिक लॉर्ड्स (Lord's) मैदानावर खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी इंग्लंडच्या संघाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Andeson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad), या दोन्ही वेगवान गोलंदाजांना दुखापत झाली आहे आणि दुसऱ्या कसोटीत त्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोघांनी बुधवारच्या अंतिम सामन्यापूर्वीच्या सराव सत्रात भाग घेतला नाही असे देखील समजले जात आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या कसोटीत त्याच्या खेळण्यावर शंका निर्माण झाली आहे. मात्र, खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, इंग्लंडने स्टुअर्ट ब्रॉडचा कव्हर म्हणून साकीब महमूदचा संघात समावेश केला आहे. (IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सवर Virat Kohli मोडणार शतकांचा दुष्काळ? ‘इतक्या’ वर्षांपासून तिहेरी अंकाला तरसला टीम इंडिया कर्णधार)

दरम्यान, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीने ब्रिटिश संघ आधीच संघर्ष करत आहे. शिवाय ब्रॉड देखील दुखापतग्रस्त झाला असून सध्या त्याच्या स्कॅनची प्रतीक्षा केली जात आहे. AFP च्या अहवालानुसार, त्याला पोटरीच्या स्नायूंना दुखापत झाल्याचा संशय आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार दुखापत गंभीर असल्यास ब्रॉडला उर्वरित कसोटी मालिकेतून वगळले जाऊ शकते. मात्र, गुरुवारपासून सुरु होणाऱ्या लॉर्ड्स कसोटी सामन्यासाठी इंग्लंड त्यांच्या दोन्ही अनुभवी गोलंदाज, अँडरसन-ब्रॉड यांच्याशिवाय मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अशास्थितीत साकीब महमूद इंग्लंडसाठी लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण करू शकतो तर मार्क वूड देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकतो.

विशेष म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंगहम येथे खेळलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरला होता. पावसाने सामन्याचा अखेरचा दिवस धुवून काढला ज्यामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. ब्रॉड आणि अँडरसन यांनी नॉटिंगहॅममध्ये भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत भाग घेतला होता. अँडरसनने पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या आणि भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळेला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या सर्वकालीन यादीत तिसरे स्थान पटकावले. मनोरंजक म्हणजे, दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (800 विकेट) आणि शेन वॉर्न (708) यांच्यानंतर तो पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारा एकमेव वेगवान गोलंदाज आहे.