IND vs ENG 2nd ODI 2021: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्ध (England) घरच्या मालिकेत उत्कृष्ट लयीत असून तो जोरदार धावा करत आहे. आता इंग्लिश संघाविरुद्ध दुसर्या वनडे सामन्यात त्याने आपल्या खेळीदरम्यान मोठे यश संपादन केले. इंग्लंडविरुद्ध खेळीदरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहलीने 10,000 धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे कोहलीपृवी एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसर्या स्थानावर फलंदाजी करताना इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाने 10,000 धावांचा टप्पा गाठला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करताना 10 हजारी टप्पा पार करणारा माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) पहिला फलंदाज आहे. आता विराट हा पराक्रम करणारा दुसरा, तर पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. (IND vs ENG 2nd ODI 2021: कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ कारनामा, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास)
एकदिवसीय सामन्यात तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करताना रिकी पाँटिंगने एकूण 12,662 धावा केल्या, तर विराट कोहली 10,000 धावांसह दुसर्या क्रमांकावर आहे. या प्रकरणात तिसर्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि फलंदाज कुमार संगकारा आहे. संगकाराने वनडेमध्ये तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करताना 9,747 धावा केल्या आहेत. विराटने तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करत 190 वनडे सामन्यात आजवर 10046 धावांची नोंद केली आहे. इतकंच नाही तर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात आपल्या अर्धशतकी खेळीसह विराटने कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेच्या ग्रीम स्मिथला पिछाडीवर टाकले आणि एलिट यादीत पाचवे स्थान पटकावले. विराटच्या नावावर आता वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 5442 धावा झाल्या आहेत, तर स्मिथने 150 सामन्यात कर्णधारपदावर राहत 5416 धावा केल्या आहेत.
दुसरीकडे, माजी पॉन्टिंग कर्णधार म्हणून सर्वाधिक वनडे धावा करणारा फलंदाज आहे. कर्णधारपदी असताना पाँटिंगने 230 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8497 धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक वनडे धावांच्या एलिट यादीत पॉन्टिंगनंतर भारताचा महेंद्र सिंह धोनीचा दुसऱ्या स्थानावर आहे.