इंग्लंडमध्ये COVID-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर टीम इंडियाच्या सुट्टीवर लागणार ब्रेक? BCCI अधिकाऱ्याने दिले स्पष्टीकरण
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 2021: मंगळवार, 6 जुलै रोजी तीन खेळाडू आणि बॅकरूम स्टाफच्या चार सदस्यांची कोविड-19 टेस्ट सकारात्मक आल्याने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) जाहीर झालेल्या इंग्लंडच्या (England) संपूर्ण एकदिवसीय संघाला स्वतःला आयसोलेट करण्यास भाग पाडले. यूकेमध्ये (UK) कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत आहेत आणि नवीन डेल्टा (Delta) स्ट्रेन सरकारसाठी मोठी चिंता बनत आहेत. भारतीय कसोटी संघ (Indian Team) देखील इंग्लंडमध्ये सध्या 20 दिवसांच्या ब्रेकची मजा लुटत आहे. मात्र, ब्रिटनमध्ये कोविड प्रकरणात (UK COVID Cases) वाढ झाल्यानंतर लंडनमधील बायोबबलमध्ये ब्रेकमधून परतण्यासाठी खेळाडूंना सांगायचे की नाही यावर बीसीसीआय अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. बीसीसीआयला (BCCI) परिस्थितीची जाणीव आहे पण स्थानिक अधिकारी किंवा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने काहीही सांगितले नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे भारतीय खेळाडू सध्या यूकेमध्ये ब्रेक एन्जॉय करू शकतात.

“आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे. अर्थात, ईसीबी आणि स्थानिक आरोग्य अधिकारी आम्हाला विद्यमान आरोग्य सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये बदलाची माहिती देतील आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल,” बीटीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. “परंतु आत्तापर्यंत आम्हाला काही सांगण्यात आले नाही. अद्याप खेळाडूंना त्यांचा डाउनटाइम कमी करण्यास सांगितले गेले नाही,” असे ते पुढे म्हणाले. भारतीय खेळाडू ब्रिटनमध्ये आपल्या जोडीदार आणि कुटुंबीयांसह ब्रेकचा आनंद घेत आहेत. 14 जुलै रोजी संपूर्ण संघाला कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी लंडनमध्ये एकत्र येण्यास सांगितले गेले आहे आणि संघाच्या बायो-बबलमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांची COVID-19 चाचणी घेण्यात येईल. या मालिकेची पहिली कसोटी सामना 4 ऑगस्टपासून ट्रेंट ब्रिज येथे खेळला जाईल.

दरम्यान, इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संपूर्ण नवीन 18 सदस्यीय संघाची नावे जाहीर केली आहेत. 8 जुलैपासून मालिकेला सुरुवात होणार असून बेन स्टोक्स याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच संघात 9 अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.