IND vs ENG 1st Test 2021: चेन्नई टेस्ट (Chennai Test) सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंड (England) संघाला टीम इंडियाचा (Team India) फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) डावाच्या पहिल्याच चेंडूवर रोरी बर्न्सला बाद करत मोठा झटका दिला. भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. डावाच्या पहिल्या चेंडूवर फिरकी गोलंदाजीची विकेट घेण्याची घटना 1907 नंतर पहिल्यांदाच घडली. इंग्लंडच्या टॉम हेवर्डला बाद केल्यावर दक्षिण आफ्रिकेचे बर्ट व्होगलर (Bert Vogler) ओव्हल येथे डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे पहिले फिरकीपटू होते. त्यानंतर, 1988 मध्ये बॉबी पीलने ओल्ड ट्रॅफर्ड येथे अॅशेसच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसर्या डावाच्या पहिल्या चेंडूवर अॅलेक बॅनरमनला बाद केले होते. दुसर्या डावात अश्विनला नवीन बॉल सोपविण्यात आला आणि 34 वर्षीय फिरकीपटूने निराश केले नाही व बर्न्सला माघारी पाठवत ऐतिहासिक टप्पा गाठला. शिवाय, ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय देखील ठरला. (IND vs ENG 1st Test Day 4: वॉशिंग्टन सुंदरची अफलातून कामगिरी, इंग्लंडविरुद्ध झुंजार अर्धशतकी खेळी करत मिळवले दिग्गजांच्या एलिट यादीत स्थान)
दरम्यान, चेन्नई येथे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दबदबा कायम ठेवला आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीनंतर खराब कामगिरीनंतर पाहुण्या संघाने दुसऱ्या डावात 241 धावांची आघाडी घेतली. यजमान संघाकडून आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यावर युवा रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने सूत्रे हाती घेत पहिल्या डावात 337 धावांपर्यंत मजल मारून देण्यास महत्वाची खेळी केली. पंतने 91 तर सुंदर 85 धावांवर नाबाद परतला. 2016 पासून घरच्या मैदानावर एकही सामना न गमावलेल्या टीम इंडियापुढे इंग्लंड चांगली कामगिरी करत मोठे लक्ष्य ठेवण्याच्या प्रयत्नात असेल.
ICYMI - Ashwin's first ball strike in the 2nd innings@ashwinravi99 was given the new ball in the 2nd innings and he struck in his very first ball. Beautiful delivery to get Burns caught at slip.
📽️📽️https://t.co/CV8ad328nb #INDvENG pic.twitter.com/JKvBoNVaOo
— BCCI (@BCCI) February 8, 2021
दुसरीकडे, टीम इंडियाचा पहिला डाव 337 धावांवर आटोपला आहे. यामुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात 241 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. टीम इंडियाकडून रिषभ पंतने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजाराने 73 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 85 धावा केल्या. इंग्लंडकडून डॉम बेस 77 धावा देत 4 विकेट घेत यशस्वी गोलंदाज ठरला. जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. स्थानिक खेळाडू वॉशिंग्टनने 12 चौकार आणि 2 षटकार लगावले आणि सातव्या विकेटसाठी अश्विनसह मूल्यवान 80 धावांची भागीदारी केली. जसप्रीत बुमराहला बाद करत जेम्स अँडरसनने भारताचा पहिला डाव संपुष्टात आणला. परिणामी सुंदरचे शतक 15 धावांनी हुकले.