IND vs ENG 1st Test Day 4: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात चेन्नई कसोटी (Chennai Test) सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाने 257 धावा केल्या असून, इंग्लंडच्या धावांपासून ते तब्बल 321 धावांनी पिछाडीवर असून चौथ्या दिवशी फॉलोऑन टाळण्याचं भारतीय संघापुढे (Indian Team) मोठं आव्हान असणार आहे. अशास्थितीत चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर टीम इंडियाला (Team India) फॉलोऑन टाळण्यासाठी एकूण 378 धावांची गरज असून चौथ्या दिवशी त्यांना आणखी 121 धावा करणे गरजेचे आहे. इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर आटोपल्यावर भारतीय संघाची सुरुवात अतिशय वाईट झाली आघाडीचे चारही खेळाडू स्वस्तात माघारी परतल्याने संघ अडचणीत आला होता. पण, चेतेश्वर चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) संयमी खेळी करत 143 चेंडूंमध्ये 73 धावा आणि रिषभ पंतने (Rishabh Pant) 91 धावांचं योगदान देत संघाचा डाव सावरला. मात्र, चौथ्या दिवशी आता संघावर फॉलोऑनचं संकट ओढवलं आहे. (IND vs ENG Test 2021: अहमदाबादचं मैदान गाजवण्यासाठी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज सज्ज, नेटमध्ये जोरदार कमबॅकचे दिले संकेत, पहा व्हिडिओ)
मेरीलेबोन क्रिकेट क्लबचा (एमसीसी) कायदा 14.1.1 नुसार, “दोन डावांमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्या आणि किमान 200 धावांनी आघाडी घेणाऱ्या संघाकडे फॉलोऑन देण्याचा पर्याय असतो.” तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी वॉशिंग्टन सुंदर 33 आणि अश्विन 8 धावा करुन खेळपट्टीवर टीकून होते. दरम्यान, यजमान टीम इंडिया इंग्लंडच्या एकूण धावसंख्येच्या 321 धावांनी पिछाडीवर आहे. आता दोन दिवसांचा खेळ शिल्लक असताना इंग्लंडला फॉलोऑन देण्याची संधी मिळताच गोलंदाजांना विश्रांती देतात का किंवा भारतीय फलंदाजांना पुन्हा मैदानावर उतरवून गोलंदाजांवर जबाबदारी सोपवते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अशास्थितीत, चौथ्या दिवशी भारतीय संघाची खरी कसोटी ठरे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
दरम्यान, भारतासाठी चौथ्या दिवशी खेळपट्टीवर स्थिरावलेले वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विन खेळाची सुरुवात करतील. सुंदरने 68 चेंडूंवर 33 धावा केल्या आहे तर, 54 चेंडूंचा सामना करणाऱ्या अश्विनने 8 धावा केल्या. त्यामुळे, चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजीचा डाव सावरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.