IND vs ENG 1st Test Day 4: भारताच्या अचूक गोलंदाजीपुढे इंग्लडचे शेर आज ढेर; अश्विनने घेतल्या 6 विकेट्स, टीम इंडियाला 420 धावांचं तगडं टार्गेट
विराट कोहली आणि आर अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 1st Test Day 4: टीम इंडिया (Team India) गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंड (England) फलंदाजांवर एकहाती वर्चस्व गाजवलं आणि दुसऱ्या डावात 178 धावांवर रोखलं. अशाप्रकारे, टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचं तगडं आव्हान मिळालं आहे. दुसऱ्या डावात इंग्लंड संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला, मात्र दुसऱ्या डावात मोठी आघाडीचा अखेर त्यांना फायदा झाला. दिवसाच्या पहिल्या सत्रात फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाचे शेर भारतीय गोलंदाजांपुढे टिकू शकले नाही आणि स्वस्तात माघारी परतले. दुसऱ्या डावात इंग्लंडचा फलंदाज अर्धशतकी धावसंख्या पार करू शकला नाही. पहिल्या डावातील द्विशतकवीर कर्णधार जो रूटने (Joe Root) सर्वाधिक 40 धावा केल्या. ओली पोप 28, डॉम बेस 25 आणि जोस बटलरने 24 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावातील आपली बॉलिंगमध्ये सुधार करत चमकदार कामगिरी बजावली. रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) सर्वाधिक 6 विकेट घेतल्या तर, शाहबाझ नदीमला 2, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्माच्या (Ishant Sharma) वेगवान जोडीला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs ENG 1st Test 2021: कसोटी क्रिकेटमध्ये R Ashwin याची कमाल, 100 वर्षात कोणालाही न जमलेला केला कीर्तिमान, जाणून व्हाल गर्वित)

टीम इंडियाला पहिल्या डावात 337 धावांवर गुंडाळलं. इंग्लंडने दुसऱ्या डावात 241 धावांची मोठी आघाडी घेत फलंदाजी सुरु केली मात्र डावाच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनने रोरी बर्न्सला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवत पाहुण्या संघाला पहिला धक्का दिला. अश्विन लयीत परतला आणि डोम सिब्ली 37 बोलमध्ये 16 धावांवर चेतेश्वर पुजाराकडे झेलबाद केलं. इशांत शर्माने डॅन लॉरेन्सला एलबीडबल्यू आऊट केलं आहे. लॉरेन्सने 47 चेंडूत 1 चौकारासह 18 धावा केल्या. बेन स्टोक्स देखील 7 धावाच करू शकला आणि बुमराहच्या चेंडूवर कॅच आऊट झाला. बुमराहने नंतर कर्णधार रुटला एलबीडबल्यू आऊट केलं. रूटने आपल्या खेळीत 32 चेंडूत 7 चौकार खेचले. ओली पोपला नदीमने 28 धावांवर माघारी धाडलं. नदीमच्या गोलंदाजीवर रिषभ पंतने जोस बटलरला 24 धावांवर स्टपिंग आऊट केलं. डॉम बेस 25 आणि जोफ्रा आर्चर 5 धावा करून परतले.

यापूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात कर्णधार जो रुटच्या 218, डोमिनिक सिब्लीच्या 87 आणि बेन स्टोक्सच्या 82 धावांच्या जोरावर 578 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर, भारतीय संघाकडून रिषभ पंतने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजाराने त्याला चांगली साथ देत 73 धावांचा डाव खेळला तर वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 85 धावा केल्या.