IND vs ENG 1st Test Day 3: पावसामुळे अखेरच्या सत्राचा खेळ वाया; भारताविरुद्ध दुसऱ्या डावात इंग्लंडच्या 11 ओव्हरमध्ये बिनबाद 25 धावा
केएल राहुल व रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Day 3: नॉटिंगहम (Nottingham) कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्राचा खेळ देखील पावसामुळे वाया गेला. पावसाने सामन्यात अडथळा निर्माण करण्यापूर्वी इंग्लंड (England) सलामीवीरांनी दुसऱ्या डावात 11.1 ओव्हरमध्ये 25 धावा काढल्या असून टीम इंडियाकडे (Team India) अद्याप 70 धावांची आघाडी आहे. दिवसाच्या सुरुवातीला ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) आणि जेम्स अँडरसनच्या (James Anderson) वेगवान गोलंदाजीच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघाचा (Indian Team) पहिला डाव 278 धावांवर आटोपला. केएल राहुल (KL Rahul), रवींद्र जडेजाने तिसऱ्या दिवशी भारताच्या लढतीचे नेतृत्व करत पावसाने बाधित सामन्यात संघाला 95 धावांची आघाडी मिळवून दिली. राहुलने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. तर जडेजाने 56 धावांचे योगदान दिले. (IND vs ENG 1st Test Day 3: रॉबिन्सनचा पंच, अँडरसनची रेकॉर्ड-ब्रेक बॉलिंग; टीम इंडिया पहिल्या डावात 278 धावांवर गारद, इंग्लंडवर 95 धावांची आघाडी)

दुखापतग्रस्त मयंक अग्रवाल व शुभमन गिलच्या जागी सलामीला उतरलेला राहुल संधीचा फायदा उठवण्याचा निर्धार करून आला होता. त्याने 214 चेंडूत 84 धावांची खेळी करत संघाला आश्वासक आघाडी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. एका बाजूने नियमित विकेट पडत असताना राहुल दुसऱ्या बाजूला तग धरून उभा राहिला. राहुल बाद झाल्यावर जडेजाने ट्रेंट ब्रिजवर 86 चेंडूंत 56 चेंडूत आठ चौकार आणि एक षटकार मारत आक्रमक अष्टपैलू भूमिका बजावली. इंग्लंडसाठी मध्यमगती वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 85 धावांवर 5 विकेट्स काढल्या. जेम्स अँडरसनने 23 ओव्हरमध्ये 54 धावा देत 4 भारतीय फलंदाजांना माघारी धाडलं. यादरम्यान, अँडरसनने गोलंदाजांच्या यादीत निल कुंबळेला मागे टाकत मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांच्यानंतर 621 विकेट्ससह तिसरे सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याचा कारनामा केला.

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे मातब्बर फलंदाज मैदानावर फार काळ तग धरु शकले नाही आणि संघाचा पहिला डाव 183 धावांवर आटोपला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी ब्रिटिश गोलंदाजांनी पाहुण्या संघाची 125/4 अशी अवस्था केली होती. त्यानंतर राहुल व रिषभ पंतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र पावसामुळे दिवसाच्या तिसऱ्या सत्राचा खेळ रद्द करण्यात आला.