IND vs BAN 2nd Test Day 1: रिद्धिमान साहा याच्याकडून खास विक्रमाची नोंद; एमएस धोनी याच्यासह 'या' यादीत झाला समवेश
रिद्धिमान साहा (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये खेळला जात आहे. दोन्ही संघ पहिल्यांदा पिंक बॉलने डे-नाईट टेस्ट खेळत आहे. दोन टेस्ट सामन्यांच्या या मालिकेत बऱ्याच मोठ्या विक्रमाची नोंद होण्याची अपेक्षा आहे. या क्रमवारीत भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याने सुरुवात केली आहे. बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यात साहाने एक खास रेकॉर्डची नोंद केली आहे. साहाने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 37 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 100 डिसमिसल्स केले आहेत. साहाने बांग्लादेशच्या शादमान इस्लाम (Shadman Islam) याचा झेल पकडत विकेटच्या मागे झेल पकडण्याच्या शतकाची नोंद केली.  यासह कसोटी क्रिकेटमध्ये विकेटमागे 100 डिसमिसल्स करणारा साहा पाचव्या भारतीय यष्टिरक्षक बनला आहे. भारतापासून आतापर्यंत अशाप्रकारचे 'शतक' फक्त चार विकेटकीपरने केले आहेत. महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने सर्वाधिक डिसमिसल्स केले आहेत. धोनीने 294, तर माजी भारतीय क्रिकेटपटू सय्यद किरमानी यांनी 198, किरण मोरे यांनी 130 आणि नयन मोंगिया याने 107 डिसमिसल्सची नोंद केली आहे.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी मालिकेत तब्बल दीड वर्षानंतर परतलेल्या साहाची मुख्य यष्टीरक्षक म्हणून निवड झाली आहे. दुसरीकडे, साहाला यंदाच्या मालिकेत धोनीचा बांग्लादेशविरुद्धचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. साहाने बांग्लादेशविरुद्ध आतापर्यंत दोन कसोटी सामन्यांमध्ये विकेटच्या मागे 7 फलंदाजांना बाद केले आहेत. बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियाकडून विकेटच्या मागे सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने बांगलादेशविरुद्ध 12 कॅच आणि 3 स्टंप केले. दुसर्‍या क्रमांकावर दिनेश कार्तिक असून त्याने विकेटच्या मागे 12 बळी टिपले आहेत. बांग्लादेशविरुद्ध साहाला धोनीचा हा खास रेकॉर्ड मोडण्यासाठी 8 डिसमिसल्स करण्याची गरज आहे.

या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशविरुद्ध डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला होता. आता दुसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवत टीम इंडिया 2 सामन्यांच्या मालिकेत क्लीन-स्वीप करण्याचा प्रयत्न करेल.