IND vs AUS 4th Test 2021: रिषभ पंत एमएस धोनीच्या वरचढ, सर्वात जलद 27 डावात 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडत मिळावले मानाचे स्थान!
एमएस धोनी आणि रिषभ पंत (Photo Credit: Facebook)

IND vs AUS 4th Test 2021: टीम इंडियाचा (Team India) विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) आपल्या कामगिरीच्या यादीत आणखी एक विक्रमाची नोंद केली आहे. आपल्या निर्भय फलंदाजीसाठी परिचित असलेल्या पंतने ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या डावात 58.3 ओव्हरमध्ये दोन धावा घेत कसोटी क्रिकेटमध्ये हजारी धावसंख्या गाठली. यासह त्याने माजी यष्टिरक्षक महेंद्र सिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) विक्रमही मोडला आणि विकेटकीपर-फलंदाजाच्या एलिट यादीत मानाचे अव्वल स्थान पटकावले. पंत आता सर्वात कमी 27 डावांमध्ये एक हजार धावा करणारा भारतीय विकेटकीपर बनला आहे. पंतने करिअरमधील महत्वाचा टप्पा गाठत माजी खेळाडूंना पछाडले. पंतपूर्वी धोनीने सर्वात जलद 32 डावात कसोटी करिअरमध्ये हजारी धावसंख्या गाठली होती. धोनीनंतर आतार फारुख इंजिनिअर यांनी 36 डावात आणि त्यानंतर रिद्धिमान साहाने 37 डावात हा पराक्रम केला आहे. (IND vs AUS 4th Test 2021: ब्रिस्बेन टेस्टमध्ये विकेटच्या मागे ‘स्पायडरमॅन स्पायडरमॅन’ गाणं गाताना रिषभ पंतचा व्हिडिओ व्हायरल, पाहून तुम्हालाही फुटेल हसू)

एकूणच बोलायचे झाले तर वेगवान 1000 कसोटी धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या नावावर आहे. त्याने केवळ 21 डावात ही कामगिरी केली आहे. या प्रकरणात भारताचा एकही यष्टिरक्षक टॉप-5 मध्ये नाही आहे. दुसरीकडे पंतबद्दल बोलायचे तर परदेशी भूमीवर त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने 2018 मध्ये इंग्लंडमध्ये दोन आणि ऑस्ट्रेलियामध्ये एक शतक ठोकले आहे. सध्याच्या मालिकेतही केवळ तीन धावांनी त्याचे शतक हुकले होते. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात 118 चेंडूत 97 धावा केल्या होत्या. शिवाय, पंत काही काळ अजून क्रीजवर थांबला असता तर सामना भारताने जिंकण्याची शक्यता वाढली असती. भारतीय विकेटकीपर म्हणून पंतने आणखी एक प्रभावी विक्रम नोंदविला असून त्यातही तो धोनीच्या पुढे आहे. पंत कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान 50 विकेट घेणारा भारतीय विकेटकीपर आहे. पंतने 11व्या कसोटी सामन्याच्या 22व्या डावात हा पराक्रम केला होता.

दरम्यान, शुभमन गिलचे पहिले कसोटी शतक अवघ्या काही धावांनी हुकले तर पंतला गब्बा येथील टेस्टच्या दुसऱ्या डावात मयंक अग्रवालच्या पुढे पदोन्नती मिलाली. मयंकच्या पुढे पंत पाचव्या स्थानाला फलंदाजीला मैदानावर उतरला. टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका विजयाच्या जवळ असून त्यांच्याकडे अद्याप 7 विकेट शिल्लक आहेत.