उमेश यादव दुखापत (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी (Sydney) येथील तिसर्‍या टेस्टपूर्वी टीम इंडियाला (Team India) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवने (Umesh Yadav) मालिकेतील उर्वरित दोन सामन्यातून माघार घेतली आहे. 33 वर्षीय वेगवान गोलंदाजाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी मांडीच्या स्नायूंना दुखापत झाल्याने मैदान सोडून जावे लागले होते. यापूर्वी, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांना देखील दुखापतीमुळे डाऊन अंडर दौऱ्यावरून (India Tour of Australia) माघार घ्यावी झाली होती. आणि आता उमेशच्या दुखापतीमुळे चार सामन्यांच्या मालिकेत संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. टीम इंडियाने मेलबर्न टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटने पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. यानंतर दोन्ही संघात 7 जानेवारीपासून तिसरा सामना खेळला जाईल जो की सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आयोजित केला जाणार आहे. या सामन्यासाठी उमेशच्या जागी खेळण्यासाठी- शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आणि टी नटराजन (T Natarajn)- असे दोन धाकड दावेदार आहेत. अशा स्थितीत तिसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन शार्दुलला दुखापतग्रस्त उमेशच्या जागी मैदानावर उतरवू शकते. (Boxing Day टेस्ट विजयानंतर भारत World Test Championship मध्ये दुसऱ्या स्थानावर)

बोर्डाच्या एका सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, "टी नटराजनच्या कामगिरीने प्रत्येकजण आनंदित आहे, परंतु शार्दुल मुंबईसाठी सतत घरगुती क्रिकेट खेळत आहे हे आपण विसरू नये." सूत्रांनी पुढे म्हटले की, "वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे शार्दुलला एकही ओव्हर न फेकता बाहेर जावे लागले हे दुर्दैव होते. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये उमेशची जागा घेऊ शकतो. दरम्यान, अंतिम निर्णय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे सिडनीला पोहोचल्यानंतर घेतील. शार्दुलने आतापर्यंत 62 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 206 विकेट घेत आपले मेहनत दर्शवली आहे.

शार्दूलने सहा अर्धशतकेही झळकावली आहेत आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना तो एक चांगला फलंदाज म्हणून उदयास आला आहे. दुसरीकडे, उमेश बेंगलोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पुनर्वसनचे आपले कार्यक्रम सुरु करेल.