IND vs AUS 3rd T20I Stats: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना सिडनी येथे खेळला गेला. अंतिम सामन्यात कांगारू संघाने बाजी मारली आणि भारताविरुद्ध टी-20 मालिकेत क्लीन स्वीप टाळत 12 धावांनी विजय मिळवला. यासह भारताने मालिका 2-1 ने जिंकली. भारताकडून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) एकाकी झुंज देत राहिला, पण त्याला दुसऱ्या बाजूने मोठी साठी मिळाली नाही. विराटने 85 धावांची आक्रमक खेळी केली, पण संघाला विजयीरेषा ओलांडून देऊ शकला नाही. विराटच्या तुफानी खेळीला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रोखले, आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. आपल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विराटने आजच्या सामन्यात काही महत्वाच्या आकड्यांची नोंद केली. (IND vs AUS 3rd T20I: विराट कोहलीची एकाकी झुंज; टीम इंडियाची क्लीन स्वीपची संधी हुकली, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत 2-1 ने मिळवला विजय)
1. विराट कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियात 3,000 धावा पूर्ण केल्या असून हा पराक्रम करणारा तो सचिन तेंडुलकरनंतर फक्त दुसरा भारतीय आहे. सचिनने ऑस्ट्रेलियामध्ये खेळत 3300 धावा केल्या आहेत. मात्र, विराट हा टप्पा गाठणारा सर्वात जलद फलंदाज बनला. विराटने ऑस्ट्रेलियामध्ये 3,052 धावा केल्या आहेत. आजवर केवळ सहा परदेशी फलंदाजांनी आपल्या कारकीर्दीत हा पराक्रम केला आहे.
2. विराटने 41 चेंडूत 3 चौकारांसह अर्धशतक ठोकले. हे कोहलीचे 363 दिवसातील पहिले अर्धशतक होते. त्याने यापूर्वी 11 डिसेंबर 2019 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. यासह विराटने रोहित शर्माच्या 25 टी-20 अर्धशतकांची बरोबरी केली आहे.
3. सिडनीमध्ये आजच्या सामन्यात विराटने आपल्या खेळी तीन षटकार लगावले. यासह विराटने टी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचे तिहेरी शतक पूर्ण केले आणि रोहित शर्मा, एमएस धोनी आणि सुरेश रैना यांच्या क्लबमध्ये सामील झाला.
4. विराट कोहलीच्या नेतृत्वात तीन किंवा त्यापेक्षा जास्त टी-20 सामन्याच्या द्विपक्षीय मालिकेत टीम इंडिया 2017 पासून आतापर्यंत अजय आहे.
5. आजच्या दिवशी, 8 डिसेंबर 2019 रोजी भारतीय संघ अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 सामन्यात पराभूत झाला होता, मात्र नंतर त्यांनी सलग 10 सामने जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र, आजच्या सामन्यात पराभवाने विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाची टी-20 सामन्यात अपराजित राहण्याची मालिका अखेर खंडित झाली.
6. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका जिंकणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
7. फाफ डू प्लेसिसनंतर ऑस्ट्रेलियामधील तिन्ही फॉर्मेटमध्ये मालिका विजयानंतर कोहली फक्त दुसरा आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरला.
दरम्यान, वनडे आणि टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघात आता 17 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळली जाईल. पहिला सामना अॅडिलेड येथे खेळला जाईल जो की एक दिवस/रात्र सामना असेल. विशेष म्हणजे या सामन्यानंतर नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे.