अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2nd Test 2020: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय (India) संघातील दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे वेळेपूर्वीच संपुष्टात आला. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinya Rahane) आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद शतकी भागीदारीने कांगारू संघाच्या नाकीनऊ आणले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) 5 विकेट गमावून 277 धावा केल्या आणि यजमान संघाविरुद्ध पहिल्या डावात 82 धावांची आघाडी घेतली. अजिंक्य नाबाद 104 धावा आणि जडेजा नाबाद 40 धावा करून खेळत आहेत. रहाणे आणि जडेजाला वगळता शुभमन गिलने 45 धावा केल्या. रिषभ पंतने 29 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियासाठी आजवर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी 2 तर नॅथन लायनला 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 2nd Test 2020: अजिंक्य रहाणेचे ऑस्ट्रेलियात डंका, MCG मध्ये सचिन तेंडुलकर 'हा' पराक्रम करणारा बनला दुसरा भारतीय कर्णधार)

दुसऱ्या दिवशी भारताने 1 बाद 36 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. भारताकडून पहिल्या दिवसाखेर नाबाद पुजारा आणि शुबमनने पहिल्या दिवसाप्रमाणे सुरुवातीला संयम राखत फलंदाजी केली. कमिन्सने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या शुभमनला बाद करत दुसऱ्या दिवशी संघाला पहिले यश मिळवून दिले. गिल 65 चेंडूत 8 चौकारांसह 45 धावा करुन बाद झाला अशाप्रकारे, त्याचे पहिले कसोटी अर्धशतक केवळ 5 धावांनी हुकले. यानंतर पुजारानेही कमिन्सच्या चेंडूवर 17 धावा आपली विकेट गमावली. हनुमा विहारीच्या रूपात भारताला चौथा धक्का बसला. लायनने त्याला 21 धावांच्या वैयक्तिक धावांवर स्मिथकडे झेलबाद केलं. रिषभ पंत 40 चेंडूत 29 धावांवर स्टार्कच्या पेनकडे झेलबाद केले. या दरम्यान, कर्णधार अजिंक्य रहाणेने 111 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस रहाणे आणि जडेजाच्या शतकी भागीदारीने संघाची धावसंख्या दोनशे पार नेली आणि कांगारू संघावर धावांची आघाडी मिळवून दिली.

यापूर्वी जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि नवोदित मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवरच गडगडला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 48 तर ट्रॅव्हिस हेडने 38 धावा केल्या. भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने चार आणि आर अश्विनने तीन गडी बाद केले. याशिवाय पहिला कसोटी सामना खेळणार्‍या मोहम्मद सिराजने दोन व रवींद्र जडेजाला एक यश मिळाले.