अजिंक्य रहाणे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd टेस्ट (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS 2nd Test Day 2: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यातील दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्टच्या (Boxing Day Test) दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने वर्चस्व कायम ठेवत चहाच्या वेळेपर्यंत 5 विकेट गमावून 189 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 195 धावांच्या प्रत्युत्तरात रहाणेच्या नेतृत्वातील टीम इंडिया अवघ्या 6 धावांनी पिछाडीवर होते जेव्हा पावसामुळे ब्रेक घेण्यात आला. सुरुवातीला मोठे धक्के बसल्यावर कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) संयमी अर्धशतकी खेळी केली आणि संघाचा डाव सावरला. दुसऱ्या सत्रानंतर रहाणे नाबाद 53 आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) नाबाद 4 धावा करून खेळत आहेत. याशिवाय, भारताला दुपारच्या लंचनंतर हनुमा विहारी आणि रिषभ पंतच्या रूपात दोन विकेट गमावल्या. विहारीने 21 तर पंत 29 धावा करून परतला. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2 तर नॅथन लायनला 1 विकेट मिळाली. (IND vs AUS, 2nd Test: MCG मध्ये अजिंक्य रहाणे याच्याकडे 'हा' कारनामा करण्याची सुवर्ण संधी, सचिन तेंडुलकरनंतर बनू शकतो दुसरा भारतीय कर्णधार)

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या सत्रामध्ये कांगारू गोलंदाजांनी भारतीय संघाला चांगली टक्कर दिली. दुपारच्या जेवणानंतर रहाणे आणि विहारीने खेळ पुढे नेट संघाला शंभरी गाठून दिली. मात्र, दोन्ही मोठी भागीदारी करू शकले नाही आणि लायनने स्लिपमध्ये विहारीला 21 धावांवर स्टिव्ह स्मिथकडे झेलबाद केलं. त्यानंतर पंत आणि रहाणेमध्ये पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. पंत 40 चेंडूत 29 धावा करून स्टार्कच्या चेंडूवर विकेटच्या मॅगी पेनकडे झेलबाद होऊन माघारी परतला. पंतच्या विकेटसह भारताचा अर्धसंघ तंबूत परतला. या दरम्यान, कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाचा डाव गडगडत असताना 111 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

दुसरीकडे, पहिल्या दिवशी भारताच्या शानदार गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 195 धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 48 तर ट्रॅव्हिस हेडने 38 धावा केल्या. भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने चार आणि आर अश्विनने तीन गडी बाद केले. याशिवाय, पहिला कसोटी सामना खेळणार्‍या मोहम्मद सिराजने दोन तर रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.