IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियात विराट कोहली रेकॉर्ड बुकमध्ये घालणार 5 विक्रमांची भर; तेंडुलकर, पॉन्टिंग, ब्रायन लारा यांना पछाडण्याची रन-मशीनला संधी
विराट कोहली (Photo Credits: Getty Images)

IND vs AUS 2020-21: आधुनिक काळातील क्रिकेटमध्ये महान फलंदाजांच्या यादीत समाविष्ट असलेला विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर (India Tour of Australia) आपल्या रेकॉर्ड बुकमध्ये अनेक विक्रमांची भर घालू शकतो. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर टीम इंडिया (Team India) तीन एकदिवसीय सामने, तीन टी-20 आणि चार कसोटी सामने खेळायचे आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट वनडे आणि टी-20 मालिकेत सामील होईल, तर पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतणार आहे. या वर्षाच्या सुरूवातीला टीम इंडियाने न्यूझीलंड दौरा केला होता, त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ तीन वनडे सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता, परंतु ते कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आले, त्यानंतर संघाने केवळ आयपीएल खेळला आहे आणि आता भारतीय संघ मार्च महिन्यानंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी तयार होत आहेत. भारतीय संघ (Indian Cricket Team) 27 नोव्हेंबर रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरेल. (IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली पडणार विक्रमांचा पाऊस, 'या' खास विक्रमांवर असेल डोळा)

1. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 416 सामन्यात 70 शतकेसह 21,901 धावा केल्या आहेत आणि 22 हजार धावा पूर्ण करण्यापासून तो फक्त 99 धावा दूर आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराटकडे हा पराक्रम करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे ज्याने 34,357 धावा केल्या आहेत.

2. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याच्या बाबतीत विराट ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगला मागे टाकू शकतो. पॉटिंगने 560 सामन्यांत 71 शतके केली आहेत आणि कोहली त्याच्यापासून अवघ्या एक पाऊल दूर आहे. या मालिकेत कोहलीने आणखी दोन शतके ठोकली तर तो पॉटिंगला मागे टाकू शकतो.

3. 32 वर्षीय विराट कोहलीने श्रीलंकाविरुद्ध ऑगस्ट 2008 मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. आतापर्यंत त्याने 248 एकदिवसीय सामने खेळले असून या मालिकेचा दुसरा सामना खेळताच तो वनडेमध्ये 250 सामन्याचा टप्पा गाठणारा आठवा भारतीय खेळाडू ठरेल. सचिन, महेंद्र सिंह धोनी, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, युवराज सिंह आणि अनिल कुंबळे यांनी 250 किंवा अधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत.

4. विराटने क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधारने 82 टी-20 सामन्यात एकूण 2,794 धावा केल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे भारतीय कर्णधार अद्याप एकही टी-20 शतक ठोकलेले नाही. आणि आता कोहलीला 3 हजार टी-20 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 206 धावांची गरज आहे.

5. ऑस्ट्रेलियामध्ये कोहलीने आजवर शानदार खेळ केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डाऊन अंडरमध्ये त्याने भारताकडून 11 शतकांसह दुसऱ्या सर्वाधिक 2,745 धावा केल्या आहेत. आणि यंदाच्या दौऱ्यावर 255 धावा करून तो सचिन तेंडुलकरनंतर ऑस्ट्रेलियात 3,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय खेळाडू बनू शकतो. तसेच, ऑस्ट्रेलियातील एका भारतीयाकडून सर्वाधिक शतके नोंदवण्यासाठी त्याला आणखी एका सेन्चुरीची गरज आहे.