विराट कोहली (Photo Credit: AP/PTI)

आयपीएल 2020 मध्ये यंदा अपेक्षेनुसार कामगिरी करण्यास अपयशी ठरलेला भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) द्विपक्षीय मालिकेसाठी कसून तयारी करत आहे. मार्च महिन्यात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटवर ब्रेक लागल्यानंतर पहिल्यांदा भारतीय संघाची ही पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका असणार आहे. यासह टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट पुन्हा एकदा आपला ठसा उमटवण्यासाठी उत्सुक असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट संपूर्ण वनडे, टी-20 आणि पहिल्या कसोटी सामन्यात झळकणार असल्याने व आयपीएलमध्ये कामगिरी करण्यास फेल झाल्याने यंदातरी विराट पुन्हा एकदा विक्रमांची बरसात असण्यासाठी उत्सुक असेल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला वनडे सामन्याने सुरुवात होणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी सिडनी (Sydney) येथे दोन्ही संघ आमने-सामने येतील. आणि इथूनच विराट आपल्या रेकॉर्ड-बुकमध्ये आणखीन विक्रमांची भर घालण्याची सुरुवात करेल. (IND vs AUS 2020-21 Series: ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेमध्ये 'या' 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर, आपल्या खेळाने बदलू शकतात मॅचचे चित्र)

त्यापैकी पहिला म्हणजे वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 12,000 धावा. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 12,000 धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. मास्टर ब्लास्टरने मैलाचा दगड गाठण्यासाठी अचूक 300 डाव खेळले आणि सेंचुरियनवर 2003 मध्ये पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कप मॅचमध्ये त्यांनी हा पराक्रम केला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीने आधीच 239 डावात 11,867 धावा केल्या आहेत. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया 3 वनडे सामने खेळणार असल्याने यंदा हा विक्रम नक्कीच विराटच्या नावावर होऊ शकतो. विराटला हा टप्पा गाठण्यासाठी 133 धावा करण्याची गरज आहे.

दुसरीकडे, कोहलीचा डोळा ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड कप विजेता कर्णधार रिकी पॉन्टिंग यांच्या विक्रमावरही असेल. कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक वनडे शतकांच्या विक्रमावर दावा करण्यासाठी कोहलीला केवळ दोन शतकांची गरज आहे. भारताचा एकदिवसीय कर्णधार म्हणून 83 सामन्यांत कोहलीने 21 शतके नोंदविली आहेत, तर एकदिवसीय कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. कॅप्टन म्हणून 230 सामन्यात पंटरने 22 शतकं केली आहेत. अशाप्रकारे विराटला तीन वनडे सामन्यांमध्ये हा पराक्रम यंदा करण्याची सुवर्ण संधी असेल.