U-19 World Cup Final: भारत-बांगलादेश खेळाडूंना ICC कडून दे धक्का, फायनलनंतर आचार संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल मानले दोषी

रविवारी अंडर-19 विश्वचषकच्या अंतिम सामन्यानंतर भारत आणि बांग्लादेशी खेळाडूंमध्ये धक्का-मुक्की पाहायला मिळाली. आयसीसीच्या आचार संहितेच्या लेव्हल 3 चे उल्लंघन केल्याबद्दल पाच खेळाडू दोषी ठरले आहेत. यात तीन बांग्लादेशी आणि दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तीन बांग्लादेशी खेळाडू; मोहम्मद तौहीद हृदॉय, शमीम हुसेन आणि रकीबुल हसन आणि दोन भारतीय खेळाडू; आकाश सिंह आणि रवी बिश्नोई यांना संहितेच्या कलम 2.21 चे उल्लंघन केल्याचे दोषी आढळले गेले. बिश्नोई कलम 2.5 तोडल्याचाही दोषी आढळला. सामन्यानंतर दोन संघातील खेळाडूंमधील शाब्दिक युद्धाचे उन्मादात रूपांतर झाले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये संघर्ष पाहायाला मिळाला होता. सामन्याच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये तन्झिम हसन साकीबच्या थ्रोवर दिव्यांश सक्सेना थोडक्यात बचावला. साकिबने जाणीवपूर्वक दिव्यांशच्या दिशेने बॉल टाकल्याचे दिसत होते. याशिवाय भारतीय फलंदाज बाद झाल्यावर बांग्लादेशी गोलंदाज काही अश्लील हावभाव करत असल्याचे समोर आले होते. सामन्यानंतर बांग्लादेशचा कर्णधार अकबर अलीनेही आपल्या खेळाडूंच्या या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. (India Vs Bangladesh U19 World Cup Final: अंडर19 वर्ल्डकप 2020 जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंना भिडले बांग्लादेशी खेळाडू; पाहा व्हिडिओ)

दरम्यान, पाचही खेळाडूंनी आयसीसी अंडर-19 विश्वचषक अंतिम सामन्याचे रेफरी ग्रॅम लॅब्रॉय यांनी प्रस्तावित केलेले दोष स्वीकारले आहे. आयसीसीने कडक भूमिका घेत तीन बांग्लादेशी आणि दोन भारतीय खेळाडूंवर कलम 2.21 चे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. वृत्तानुसार बांग्लादेश संघातील एका खेळाडूने टीम इंडियाच्या सदस्यास अपशब्द बोलले, ज्याला भारतीय खेळाडूंनीही प्रत्युत्तर दिले.

बिश्नोईने सामन्यादरम्यान वेगळ्या घटनेसाठी कलम 2.5 चे उल्लंघन केल्याचा लेव्हल 1चा आरोपही स्वीकारला. बिश्नोईने 23 व्या ओव्हरमध्ये अविशेक दासला बाद केल्यावर भाषा, कृती किंवा जेश्चर वापरला ज्याने तिरस्कार किंवा एखाद्या फलंदाजाकडून आक्रमक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकेल. यासाठी त्याला आणखी दोन डिमॅरिट पॉईंट्स म्हणजेच एकूण सात डिमिरिट्स पॉईंट्स त्याला मिळाले.