Team India (Photo Credit - Twitter)

IND vs AFG T20 Series 2024: टीम इंडिया (Team India) आता या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) तयारीला सुरुवात करणार आहे. लवकरच अफगाणिस्तान क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर (Afghanistan Tour India) येणार असून तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका IND vs AFG T20 Series 2024) खेळवली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात 11 जानेवारीपासून मोहालीत होणाऱ्या सामन्याने होणार आहे. दरम्यान, या मालिकेसाठी भारतीय संघाचा संघ काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. म्हणजेच या मालिकेत कोण कोण खेळाडू खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाची कमान सांभाळताना दिसणार असल्याचे मानले जात आहे. पण अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. (हे दखील वाचा:

रोहित शर्मा वर्षभरानंतर दिसणार टी-20 संघात

2022 साली झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीनंतर रोहित शर्माने एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. म्हणजे संपूर्ण वर्ष 2023 सरले, पण तो टी-20 खेळताना दिसला नाही. विराट कोहलीचीही अशीच अवस्था आहे. दरम्यान, रोहित आणि कोहलीबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाही, मात्र अफगाणिस्तानविरुद्ध केवळ रोहित शर्माच भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार असल्याचे मानले जात आहे. विराट कोहलीचा विचार केला तर त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. (हे देखील वाचा: ICC T20 World Cup 2024 Schedule Announced: आयसीसी टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी खेळवला जाणार भारत - पाकिस्तान सामना)

या खेळाडूंना मिळू शकते विश्रांती

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीसाठी तंदुरुस्त राहणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज देखील विश्रांती घेताना दिसतील, परंतु ते पुन्हा कसोटी मालिकेत पुनरागमन करतील. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा देखील कसोटी मालिकेतून पुनरागमन करताना दिसतील. मात्र, सध्या विश्रांतीवर असलेले किती खेळाडू टी-20 विश्वचषक 2024 च्या संघात परततील हे सांगणे कठीण आहे. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या फिट नाहीत, त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता फारच कमी आहे.

भारताचा युवा संघ उतरू शकतो अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली युवा संघाची निवड होऊ शकते. ज्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपापल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांना भारतीय संघात संधी मिळाली तेव्हा त्यांची कामगिरी तिथेही पाहायला मिळाली. यशस्वी जैस्वाल, तिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार यासारखे नवीन खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. या सर्वांना पुढील मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. तर संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि शिवम दुबे हे खेळाडू सातत्याने आपली प्रतिभा सिद्ध करत आहेत.

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलबाबत सस्पेन्स

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्याबाबत अद्याप निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही. कुलदीप यादव भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा भाग असू शकतो. पण युझवेंद्र चहलचे काय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. टीम इंडियाचा संभाव्य संघ असाच राहिला तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडू पहिल्यांदाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसतील. एक ते दोन दिवसांत बीसीसीआय निवड समिती भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करेल, असे मानले जात आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, इशान किशन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध किष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.