बिग बॅश लीग (Photo Credit: Facebook)

इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकच्या इंग्लंडच्या न्यूझीलंडविरुद्ध फायनल मॅचमध्ये विजयात  बजावलेल्या वादग्रस्त नियम यंदा ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या बिग बॅश टी-20 लीग (Big Bash League) मध्ये उपयोग होणार नाही. निर्धारित ओव्हरमध्ये धावा टाय झाल्यावर न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सुपर ओव्हरदेखील टाय झाली आणि ती देखील टाय झाल्यावर अधिक बाउंड्रीच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर सुपर ओव्हरमधील हा नियम विवादात अडकला. डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध बिग बॅश लीगमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) महत्वपूर्ण बदल केले आहेत. यामध्ये एक सुपर ओव्हर (Super Over) अनिर्णित राहिल्यास सुपर ओव्हर सुरूच राहील असा नवा नियम बनवण्यात आला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी सांगितले की, नवीन नियमांनुसार पुरुष आणि महिला टी-20 लीगमध्ये जर दोन संघांमधील सामना अनिर्णित राहिला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. पण ती सुपर ओव्हर जर अनिर्णित राहिली, तर एक संघ स्पष्ट विजेतेपद मिळवेपर्यंत सुपर ओव्हरचा खेळ सुरूच ठेवण्यात येईल. दरम्यान, साखळी सामन्यात सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास दोन संघांना गुण विभागून दिले जातील, असेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे. तर हा नियम फक्त फायनलमध्ये लागू होईल.

15 जुलै रोजी लॉर्ड्स येथे झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये न्यूझीलंडने 8 बाद 241 धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा संपूर्ण संघ 241 धावांवर बाद झाला आणि मॅच टाय झाली. आयसीसीच्या नियमानुसार सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यात, दोन्ही संघांनी 15 धावा केल्या. पण, इंग्लंडला अधिक बाउंड्री मारण्याच्या आधारावर विजयी घोषित करण्यात आले. यानंतर अनेकांनी या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयसीसीचे मुख्य कार्यकारी जेफ लेर्डीस यावर म्हणाले होते की, अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट समिती पुढील वर्षी होणाऱ्या बैठकीत विश्वचषकात उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर चर्चा करेल. पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टी-20 मध्ये बाउंड्रीबद्दलचा हा नियम बदलण्याची शक्यता आहे.