Coronavirus: कोरोनाच्या संकट काळात आर अश्विन याने सांगितली सकारात्मक बातमी, वाचून तुम्हालाही वाटेल दिलासा
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे, त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात सोशल मीडिया, प्रसार माध्यमांच्या या संकटावरील नकारात्मक बातम्यांनी हा आजार लवकर दूर होईल की नाही यावर शंका निर्माण केली आहे. मात्र, सध्या या चिंतेच्या वातावरणात भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने एक सकारात्मक पोस्ट शेअर केली आहे. ही पोहून यूजर्सनाही नक्कीच थोडा दिलासा वाटेल. जगभरात पसरलेल्या कोरोनाची आजवर 32 लाखहुन अधिक लोकांना लागण झाली आहे. अमेरिका, फ्रांस, इटली, स्पेन, चीन या सारख्या देखत या व्हायरसने कहर केला आहे. लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहे. अमेरिकामध्ये मागील 24 तासात 2000 हुन अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. भारतात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या 33 हजाराच्या वर पोहचली आहे. लॉकडाउन असतानाही रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. (Coronavirus: फिफा वर्ल्ड कप 2022 चे एंबेसडर आदेल खामिस कोरोना पॉसिटीव्ह, यापूर्वी 3 स्टेडियममधील 8 कर्मचारीही झाले संक्रमित)

असे असतानाही अश्विनने शेअर केलेली माहिती या व्हायरसविरुद्ध जिद्दीनं लढा देण्यासाठी तुम्हालाही प्रेरित करेल. अश्विनने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात आजवर 10 लाखाहून अधिकांनी कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला आहे. जगभरात 10 लाख 43 हजार 245 लोकं बरे झाले आहेत. अश्विनने म्हटले की, "जगात कोरोनाचे संकट आहे आणि आपणास रोज नकारात्मक बातम्या ऐकायला मिळत आहे. पण, मी सांगू इच्छितो की या व्हायरसवर मात करणाऱ्यांची संख्या 10 लाखांच्या वर पोहचली आहे."

या विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन लाख 28 हजारांवर गेली आहे. दुसरीकडे, भारताने कोरोना व्हायरस संक्रमित लोकांचा 35,000 प्रकरणांचा गंभीर टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांनीही हजार रुग्णांचा आकडा ओलांडला आहे.