BCCI Central Contract List: टीम इंडियाच्या वार्षिक करारातुन ‘या’ खेळाडूंची झाली सुट्टी, 3 युवा खेळाडूंची करोडपती-क्लबमध्ये एंट्री
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

BCCI Central Contract List: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यंदाच्या करारात (BCCI Contracts) सहभागी असलेल्या पुरुष खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. गुरुवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या या वार्षिक करारामधून केदार जाधव (Kedar Jadhav) आणि मनीष पांडे (Manish Pandey) यांना वगळण्यात आले आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याची पदोन्नती झाली आहे, तर युजवेंद्र चहलचं डिमोशन झालं आहे. याशिवाय विशेष म्हणजे मोहम्मद सिराज (Mohammed Siraj), शुभमन गिल आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांनी बीसीसीआयच्या (BCCI) यादीत पहिल्यांदा स्थान मिळवले आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, व्हाइट बॉल क्रिकेटचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बीसीसीआयच्या टॉप करारात सामील आहेत. या ग्रेडमधील खेळाडूंना सात कोटी रुपये रक्कम मिळते. एकूण 28 भारतीय क्रिकेटपटूंना चार श्रेणींमध्ये केंद्रीय करार देण्यात आला आहे. (BCCI Central Contracts List 2020-21: टीम इंडिया खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा; ‘हे’ खेळाडू होणार करोडपती, पहा संपूर्ण यादी)

मागील अनेक दिवसांपासून संघातून बाहेर असणाऱ्या केदार जाधवला वार्षिक करारातून वगळण्यात आले आहे तर त्याचबरोबर बीसीसीआयने यंदाच्या करारामध्ये मनीष पांडेचादेखील समावेश केलेला नाही. लक्षात घेण्यासारखे म्हणजे 2020 फेब्रुवारीपासून जाधवने भारताकडून कोणताही सामना खेळलेला नाही. हा करार ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीसाठी आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या करारात अक्षर पटेल, शुभमन गिल, मोहम्मद सिराज यांना जागा मिळाली असून यांना भारतीय बोर्डाकडून वार्षिक एक कोटी रुपये मिळतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आणि इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर द्विपक्षीय मालिकेत केलेल्या कामगिरीचं फळ या नवोदित खेळाडूंना मिळालं आहे. शुभमन आणि सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली तर अक्षरने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवले.

दरम्यान, या करारात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ग्रेड A+ मध्ये कायम आहेत तर अष्टपैलू हार्दिक पांड्याची पदोन्नती झाली असून तो ग्रेड-A मध्ये पोहोचला आहेत. फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ग्रेड-C मध्ये घसरले आहेत. यापूर्वी ग्रेड A ग्रेडमध्ये असलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारही ग्रेड-B मध्ये घसरला आहे.