
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा विकेटकीपर अॅलेक्स कॅरी (Alex Carey) याने पकडलेला कॅच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) सध्या सुरु असलेल्या शेफील्ड शील्ड (Sheffield Shield) स्पर्धेदरम्यान कॅरीने सुपरमॅनसारखे उडत हवेत उडी मारून झेल पकडला आणि सर्वांना अचंबित केले. विकेटकीपर कॅरीने क्वीन्सलँडचा सलामीवीर मॅट रेनशॉ याला बाद करण्यासाठी हवेत उडी मारत एक हाती झेल पकडला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यानंतर चाहते त्याला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये शेफील्ड शील्ड टूर्नामेंट अंतर्गत दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँड (Queensland) यांच्यात सामना होता. क्वीन्सलँडचा सलामीवीर रेनशॉने चेंडूला डाव्या बाजूस सीमारेषेबाहेर पाठविण्याचा प्रयत्न केला परंतु कॅरीने चपळता दाखवली आणि उजव्या बाजूला उडी मारली आणि एका हाताने शानदार झेल पकडला.
कॅरीने पकडलेला कॅच पाहून प्रत्येक ऑस्ट्रेलियन चाहत्याने त्याचा कसोटी संघात समावेशासाठी वकिली करण्यास सुरवात केली आहे. सध्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियासाठी विकेटकिपिंगची जबाबदारी कर्णधार टीम पेन याच्याकडे आहे. कॅरीच्या या अचंबित करणाऱ्या कॅचसह त्याने टेस्ट संघात समावेश करण्यासाठी दावेदार दर्शवली आहे. पहा कॅरीने पकडलेला अप्रतिम झेल:
दरम्यान, कॅरीने ऑस्ट्रेलियाचा 29 वनडे सामने खेळले आहेत आणि 805 धावा केल्या आहेत. कॅरी ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघाचा देखील भाग होता. पण, इंग्लंडविरुद्ध मॅचदरम्यान जोफ्रा आर्चर याला घटक बाउंसर त्याच्या हनुवटीला लागला. त्याच्यानंतर तो रक्तबंबाळ झाला होता. कॅरीने दुखापत झाल्यावरही स्टिव्ह स्मिथ याला मैदानात साथ दिली. त्याने संयम दाखवत 46 धावा केल्या होत्या. विश्वचषकदरम्यान कॅरीने 10 मॅचमध्ये 62.50 च्या सरासरीने 375 धावा केल्या होत्या. कॅरीची खेळी पाहून काहींनी त्याला विश्वचषकमधील सर्वश्रेष्ठ विकेटकीपर म्हणून देखील संबोधले होते.