Photo Credits: Twitter/BCCI

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडविरुद्ध (England) चेन्नईच्या चेपॉक (Chepauk) स्टेडियमवर दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान टीम इंडियाने (Team India) शानदार विजय मिळवला. जो रूटच्या इंग्लंड टीमला दिलेल्या 478 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात संघ अवघ्या 164 धावाच करू शकला आणि 317 धावांनी संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने (Axar Patel) सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. पहिल्या सामन्यात पराभव पत्करलेल्या टीम इंडियासाठी दोन्ही डावात प्रत्येक खेळाडूने योगदान दिले आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आता आपण अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. (ICC World Test Championship: इंग्लंडला पराभवाचा मोठा फटका, या स्थानी घसरण तर टीम इंडियाची Chepauk विजयानंतर दुसऱ्या स्थानी झेप)

1. रोहित-रहाणेची शतकी भागी

दारीटॉस जिंकून टीम इंडियाने पहिल्या डावात अडखळत सुरुवात केली. शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यावर रोहितला मधल्या फिलीतील रहाणेची साथ मिळाली. रोहित आणि रहाणेच्या जोडीने इंग्लंड गोलंदाजांचा संयमाने सामना केला आणि चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाय रचला. रोहितने यादरम्यान 161 आणि रहाणेने 67 धावांची खेळी केली.

2. रिषभ पंतची फटकेबाजी

इंग्लंड गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना बाद करत संघाची बिकट स्थिती केली असताना पंत पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आला. एका टोकाला विकेट पडत असताना पंतने आपली बाजू धरून ठेवली आणि इंग्लंड फिरकीपटूंचा समाचार घेतला. पंत 58 धावा करून नाबाद परतला.

3. रविचंद्रन अश्विनची फिरकी

घरच्या मैदानावर खेळण्याचा अश्विनने भरपूर फायदा करून घेतला. फिरकीपटूंना साजेशा खेळपट्टीवर अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंड फलंदाजांनी लोटांगण घातलं. या दरम्यान, अश्विनने 29 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये पाच विकेट घेतल्या आणि इंग्लंडला स्वस्तात बाद करत संघाला दुसऱ्या डावात मोठी आघाडी मिळवून दिली.

4. अश्विनची शंभरी

बॉलने इंग्लंड अडचणीत आणल्यावर अश्विनने बॅटनेही कमाल कामगिरी केली. दुसऱ्या डावात आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले असताना अश्विनने कोहलीसह सातव्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी करत पहिले संघाचा डाव सावरला. त्यानंतर, कोहलीसह खालच्या फळीतील साथीदार नियमित अंतराने बाद होत असताना अश्विनने पाहुण्या संघाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि तुफानी अंदाजात पाचवे कसोटी शतक झळकावले आणि संघाची आघाडी चारशे पार नेली.

5. अक्षर पटेलचा पॉवर पंच

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात अक्षर पटेलने स्वतःची निवड योग्य सिद्ध केली. अक्षरला बॅटने कमाल करता आली नसली तरी त्याने बॉलने मात्र इंग्लंड फलंदाजांना चांगलाच त्रास दिला. पहिल्या डावात अक्षरने 2 विकेट घेतल्या तर दुसऱ्या सामन्यात त्याला चेपॉक खेळपट्टीवर चांगली लय मिळाली आणि डेब्यू टेस्ट सामन्यात 5विकेट घेतल्या व इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला.