केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG ODI) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नवीनतम संघ क्रमवारी जाहीर केली आहे. इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने (Team India) ताज्या क्रमवारीत आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मागे टाकले आहे. भारतीय संघ 105 गुणांसह चौथ्या क्रमांकावर होता, परंतु मंगळवारी इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने विजय मिळवल्याने त्याचे 108 गुण झाले असून ते आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, पाकिस्तान 106 गुणांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंड 126 गुणांसह आघाडीवर आहे तर इंग्लंड 122 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध क्लीन स्वीप करत पाकिस्तानने भारताला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले होते. ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पराभवाचाही त्याला फायदा झाला. मात्र, संघ तिसर्या क्रमांकावर फार काळ टिकू शकला नाही आणि भारताने पुन्हा एकदा या स्थानावर कब्जा केला. या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करून भारत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान आणखी मजबूत करू शकतो. हेही वाचा ICC Women's Rankings: श्रीलंकेत शानदार प्रदर्शनानंतर अथापथु, हरमनप्रीतने ICC महिला खेळाडूंच्या क्रमवारीत घेतली आघाडी
भारताने इंग्लंडविरुद्धचे उरलेले दोन एकदिवसीय सामने गमावले तर संघ पाकिस्ताननंतर चौथ्या क्रमांकावर घसरेल. पाकिस्तान पुढील महिन्यात रॉटरडॅम येथे नेदरलँड्सविरुद्ध पुढील वनडे मालिका खेळणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ या दौऱ्यात पाच दिवसांत तीन 50 षटकांचे सामने खेळणार आहे.