Gujarat Student Gets 212 Out Of 200 Marks: प्राथमिक शाळेच्या निकालात मास्तरांचा प्रताप, विद्यार्थ्याला 200 पैकी 212 गुण; गुजरातमधील दाहोद जिल्हा देशभर चर्चेत
Education

Marksheet Discrepancy in Gujarat: गुजरात राज्यातील दाहोद जिल्ह्यातील (Dahod District) प्राथमिक शिक्षण विभागाच्या (Primary Education) शाळेतील वार्षिक परिक्षा निकालात झालेल्या त्रुटींमुळे वाद निर्माण झाला असून शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वंशीबेन मनीषभाई या चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला तिची गुणपत्रिका मिळाली तेव्हा केवळ विद्यार्थिनीच नव्हे तर तिच्या मित्र-मैत्रिणींसह कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण, शाळेतील ढिसाळ कारभाराचा प्रताप म्हणून विद्यार्थिनिला भाषा विषयात चक्क 200 पैकी 211 गुण आणि गणित विषयातही 200 पैकी 212 गुण प्राप्त झाले होते. घडला प्रकार लक्षात येताच विद्यार्थी गोंधळून तर शाळा प्रशासन भांबावून गेले. गुजरातमधील शालेय विभागाच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीची पावती असणारे हे गुणपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

शालेय प्रशासनाने सुधारली चूक

वंशीबेन मनीषभाई या चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तिची गुणपत्रिका काळजीपूर्वक तपासली असता तिला त्यातील त्रुटी आढळून आली. त्यामुळे तीने ती कुटुंबीयांनाही दाखवली आणि घडलेली चूक शिक्षकांच्याही निदर्शानास आणून दिली. ज्यामध्ये तिला गुजराती भाषा या विषयात 200 पैकी 211 गुण आणि गणित विषयातही 200 पैकी 212 गुण मिळाले. त्यानंतर शालेय प्रशासनाची एकच धावपळ उडाली. त्रुटी लक्षात आल्यानंतर शालेय प्रशासनाने ती दुरुस्त केली आणि तिला भाषा विषयात (गुजराती) 200 पैकी 191 गुण आणि गणितातील 200 पैकी 190 गुण अशी दुरुस्ती करण्यात आली. तसेच, उर्वरित विषयांचे गुण अपरिवर्तित ठेवण्यात आले. सुधारित निकालासह, वंशीबेनचे एकूण गुण 1000 पैकी 934 इतके होते. (हेही वाचा, Sunny Leone's Photo on Exam Admit Card: उत्तर प्रदेश पोलीस परीक्षा प्रवेशपत्रावर सनी लियोनचा फोटो)

दरम्यान, त्रुटीच्या प्रत्युत्तरात, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी कारण ओळखण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना लागू करण्यासाठी तपास सुरू केला आहे. (हेही वाचा, कर्नाटक मध्ये TET परीक्षेच्या हॉल तिकीटावर Sunny Leone चा फोटो; शिक्षण विभागाकडून 'हे' स्पष्टीकरण देत तपास सुरू)

शालेय विभागात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असताना अशा अनेक त्रुटी घडताना दिसतात. कर्नाटक राज्यातही एकदा अशीच घटना घडली होती. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या हॉलतिकीटावर चक्क सनी लियॉनचा फोटो छापून आला होता. ते हॉल तिकीटही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्याची नोंद संबंधित विभागाने तातडीने घेतली आणि त्याबाबत खुलासा केला. घडल्या प्रकाराबद्दल बोलताना संबंदित विभागाने तेव्हा म्हटले होते की, फोटो आणि माहितीचा तपशील हा उमेदवाराने पोर्टलवर भरायचा असतो. त्यामुळे याबाबतची माहिती भरण्याची संपूर्ण जबाबदारी ही सर्वस्वी उमेदवाराची असते. त्यांनी जी माहिती आणि छायाचित्र दिले जाते त्यावरुनच हॉलतिकीट छापले जाते. त्यामुळे या चुकीबाबत प्रशासनाला जबाबदार धरले जाऊ नये. तरिसुद्धा त्रुटी दूर करुन विद्यार्थ्याला सहकार्य केले जाईल.