Here’s a Fact Check About Fake Image of INR 5,000 Note (Photo Credits: @PANDITVIVEKj)

Fact Check: भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank Of India) 5,000 रुपयांची नोट जारी करणार असल्याच्या दाव्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कथित उच्च मूल्याच्या नोटेची प्रतिमा असलेल्या व्हायरल पोस्ट्समुळे नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि अटकळींना उधाण आले आहे. असे असले तरी, लेटेस्टलीने केलेल्या पडताळणीमध्ये (RBI Fact Check) सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे पुढे आले. आरबीआय अशा प्रकारे नोट आणण्याबाबत सध्या तरी कोणतीहीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तथापि, सोशल मीडियावरील दावे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे पुढे येते.

व्हायरल पोस्ट काय सांगतात?

एका सोशल मीडिया पोस्टमध्ये कथित 5,000 रुपयांची नोट दाखवल्यानंतर अफवा पसरू लागल्या, ज्यामुळे त्याची सत्यता आणि संभाव्य परिणाम याबद्दल वाद निर्माण झाला. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली 1978 साली 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा रद्द केल्या गेल्यासारख्या ऐतिहासिक घटनांच्या संदर्भांनी चर्चेला आणखी चालना दिली.

तथ्य काय सांगते?

ऑनलाइन चर्चा, दावे प्रतिदावे होत असले तरी, वास्तव असेकी, आरबीआयने अशा नोटा सादर करण्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी जारी केलेली नाही.

व्हायरल झालेल्या प्रतिमेचे मूळ

लोकांच्या शंका आणि तर्कांना चालना देणारी प्रतिमा SuperDuper _ Bruh नावाच्या Reddit वापरकर्त्याने तयार केली होती. "5000 भारतीय रुपयांच्या नोटेची माझी संकल्पना (फक्त पुढच्या बाजूला)" असे शीर्षक असलेली ही रचना केवळ एक सर्जनशील संकल्पना आहे आणि अधिकृत चलनी नोट नाही, असेही त्यांने म्हटले होते.

5, 000 रुपयांच्या नोटांवर आरबीआयची कारवाई

ऐतिहासिकदृष्ट्या, 1950 च्या दशकात 5000 आणि 10,000 रुपयांच्या मोठ्या चलनी नोटा चलनात आणल्या गेल्या, परंतु भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठी नंतर त्या मागे घेण्यात आल्या. 2014 मध्ये आरबीआयने अधिकृतपणे स्पष्ट केले की 5000 रुपयांची नोट जारी करण्याचे वृत्त खोटे होते.

आरबीआयच्या प्रवक्त्याने त्यावेळी एनडीटीव्हीला सांगितले की, अशी कोणतीही योजना नाही. ही अफवा कशी सुरू झाली हे आम्हाला माहीत नाही. ऑनलाइन वापरकर्त्यांनी ही व्हायरल झालेली प्रतिमा "खराब प्रकारे फोटोशॉप केलेली 1,000 रुपयांची नोट" म्हणूनही फेटाळली होती.

RBI INR 5000 ची नोट सादर करत असल्याच्या दाव्यांसह सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे

महत्त्वाची निरीक्षणे आणि माहिती

  • सोशल मीडियावर व्हायरल झालेली 5, 000 रुपयांची नोट ही आरबीआयची अधिकृत रचना नाही.
  • भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 1978 साली 5000 आणि 10,000 रुपयांच्या मोठ्या चलनी नोटा रद्द करण्यात आल्या.
  • आरबीआयने नवीन उच्च मूल्याच्या नोटा आणण्याच्या कोणत्याही योजनेची घोषणा केलेली नाही.

वस्तुस्थिती काय

आरबीआयने 5, 000 रुपयांची नोट आणल्याचा दावा खोटा आहे. प्रसारित होणारी प्रतिमा ही रेडिट वापरकर्त्याने तयार केलेली संकल्पना आहे आणि त्याचा आरबीआयशी किंवा असे चलन जारी करण्याच्या कोणत्याही योजनेशी संबंध नाही.