Fact Check: लखनऊच्या सांडपाण्यात Covid-19 सापडला? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या मेसेजमागील सत्य
Representational picture | (Photo Credits: istockphoto.com/Kuvona)

देशात कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीने जोर धरायला सुरुवात केल्यावर या व्हायरसबाबत विविधांगी गोष्टी व्हायरल होत आहेत. आधीच या महामारीमुळे जनता घाबरली आहे, त्यात सोशल मिडियावर प्रसारित होणाऱ्या गोष्टी या भीतीमध्ये अजून भर घालत आहेत. आता लखनऊ (Lucknow) येथील सांडपाण्यात (Sewage Water) कोरोना विषाणू सापडला असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. त्यानंतर एकच गदारोळ माजला. अनेकांनी ही बातमी सोशल मिडियावर शेअर केली होती. मात्र आता त्यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS) यांनी मंगळवारी, सोशल मीडियाच्या वृत्ताचे खंडन केले ज्यामध्ये म्हटले होते की, लखनऊ शहरातील खदरा परिसरातील सांडपाण्यात कोरोना व्हायरस सापडला आहे.

वृत्तानुसार, आयसीएमआर-डब्ल्यूएचओ द्वारे देशात सांडपाण्याचे नमुने तपासले जात आहेत. पाण्यातील कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी लखनौ, हैदराबाद, पुणे, मुंबईसह देशातील आठ शहरांमधून सांडपाण्याचे नमुने गोळा केले जात आहेत. या पुढाकाराचा एसजीपीजीआय एक भाग होता. वृत्तामध्ये पुढे म्हटले आहे, लखनऊमधील खदरा परिसर,  घंटाघर आणि मछली मोहाल येथून 19 मे रोजी हे नमुने घेण्यात आले असून, प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीत त्यापैकी खदरा येथील पाण्यात कोरोना विषाणू सापडला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आता एसजीपीजीआय मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख , डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये SARS COV-2 RNA असल्याचे अजूनतरी सिद्ध झाले नाही. यासाठी पुढील अभ्यासाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. घोषाल पुढे म्हणाल्या की, कोरोना व्हायरस मुख्यत: सकारात्मक रूग्णाच्या श्वसन स्रावांच्या थेंबांमधून पसरतो आणि सध्या पाण्यातून त्याचा प्रसार झाल्याचा कोणताही पुरावा नाही. काही रूग्णांच्या स्टूलच्या नमुन्यांमध्येही हा विषाणू सापडला आहे. (हेही वाचा: कोरोना लस घेतल्यानंतर 2 वर्षात मृत्यू होणार असल्याचा फ्रांसचे नोबल पुरस्कार विजेते Luc Montagnier यांचा दावा? PIB ने उघडकीस आणले सत्य)

दरम्यान, भारतामध्ये हैदराबाद आणि मुंबईतील सांडपाण्यामध्ये कोरोना व्हायरसचे अस्तित्व दिसून आले आहे, मात्र लखनऊच्या पाण्यामध्ये त्याची अजूनतरी पुष्टी झाली नाही.