लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजापमध्ये प्रवेश घेतलेल्या अभिनेत्री जयाप्रदा (Jaya Prada) यांनी सध्या स्कुल चलो (School Chalo Mission) अभियानाच्या अंतर्गत शाळकरी मुलांना धडे द्यायचा विडा उचलला आहे. मात्र रामपूर (Rampur) मधील एका शाळेत झालेल्या प्रसंगानंतर जया प्रदा यांना आपल्याच ज्ञानावरून ट्रोल व्हायची वेळ आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सुद्धा जोरदार व्हायरल होत आहे. इंग्रजी शिकवताना जयाप्रदा यांनी 'Country' या शब्दाची चुकीची स्पेलिंग लिहिली होती, योगायोगाने हा क्षण व्हिडीओ मध्ये पकडला गेला. त्यामुळे आता त्यांना नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.
झालं असं की, ‘स्कूल चलो अभियाना’अंतर्गत जयाप्रदा या हजरतनगर सैदपुर येथील एका शाळेत पोहोचल्या होत्या. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना हिंदीत पढवल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इंग्रजी येतं ना? असा प्रश्न केला , यावर मुलांनी होकार दिल्यावर जयाप्रदा यांनी फळ्यावर काही फळांची नावं इंग्रजीत लिहिली, आणि अखेरीस त्यांनी ‘भारत माझा देश आहे’ हे वाक्य इंग्रजीत लिहिलं. पण, या वाक्याची इंग्रजीतील अचूक स्पेलिंग “India is my country” अशी असताना जया प्रदा यांनी country ची स्पेलिंग चुकवली आणि त्याऐवजी contry असं लिहिलं. त्यावेळी काही शिक्षिका देखील वर्गात उपस्थित होत्या पण कोणीही हस्तक्षेप केला नाही. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
पाहा नेमकं घडलं काय?
दरम्यान, प्राथमिक शिक्षण अधिकारी ऐश्वर्या लक्ष्मी यांनी एबीपी न्यूजशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार . जया प्रदा यांनी चुकीची स्पेलिंग लिहिली हे त्यांच्या त्याच वेळी लक्षात आलं होतं, पण त्यावेळी त्यांना विद्यार्थ्यांनी गराडा घातल्यामुळे सांगितलं नाही. त्या निघून गेल्यावर त्यांची चूक दुरूस्त करण्यात आली.