Uttar Pradesh: चारित्र्याच्या संशयावरून पतीचे धक्कादायक कृत्य; पत्नीला मारहाण करीत अ‍ॅल्युमिनियमच्या तारेने शिवला प्रायव्हेट पार्ट  
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) रामपूरमध्ये (Rampur) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीसोबत क्रौर्याच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला केवळ मारहाणच केली नाही, तर तिचे हात पाय बांधून, तोंडात एक कापडाचा बोळा घालून तांब्याच्या तारेने तिचा प्रायव्हेट पार्ट शिवला आहे. पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. हे प्रकरण मिलक पोलिस स्टेशन परिसरातील ठिरीया विष्णू गावचे आहे. येथील एका व्यक्तीचा आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता त्यामुळे पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडण होत होते.

दोन वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले होते. लग्नानंतर पतीचे वागणे विचित्र होते. तो नेहमी पत्नीवर संशय घेत होता. तिला कोणत्याही व्यक्तीशी बोलू देत नव्हता तसेच नेहमी तिचा फोन चेक करत होता. शनिवारी, पुन्हा एकदा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यामुळे पती संतापला व हिंसक झाला. त्याने पत्नीला मारहाण केली व त्यावेळी त्याने तिचा प्रायव्हेट पार्ट शिवून टाकला. महिला वेदनेने तळमळत होती, ओरडत होती. त्यानंतर पती तिथून पळून गेला. महिलेने आपल्या आईला फोन करून घडलेली हकीकत सांगितली. गंभीर परिस्थितीत पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले असून, पतीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलिस अधीक्षक शगुन गौतम यांनी सांगितले की, रामपूर पोलिस स्टेशन परिसरात एका महिलेला तिच्या पतीने मारहाण केली आणि अमानुष कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत आम्ही त्वरित गुन्हा दाखल करून त्या महिलेचे मेडिकल केले. एसपीच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय उपचारांमध्ये ज्या जखमा आढळल्या आहेत त्याच्या आधारे पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. (हेही वाचा: Uttar Pradesh: लज्जास्पद! लैंगिक अत्याचार करण्याचा विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ब्लेडने हल्ला)

मुलीच्या आईने सांगितले की, लग्नापासूनच आपला जावई मुलीशी व्यवस्थित वागत नव्हता. तो तिला नेहमी मारहाण करीत असे. हुंड्यावरून देखील त्याने मुलीला अनेकवेळा मारहाण केली आहे. जेव्हा मुलगी गरोदर होती तेव्हाही त्याने मारहाण केली होती. तिच्या पोटावर त्याने लाथ मारल्याने पोटातच बाळाचा मृत्यू झाला होता.