Chinese Apps Banned In India: भारतात चीनी ऍपवर आत्ताच बंदी कशी? शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारला सवाल
Sanjay Raut | Photo Credits: Twitter

पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारतात चीन विरोधात प्रचंड रोष आहे. अशात सोमवारी म्हणजेच 29 जून रोजी रात्री उशिरा भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक केला. 59 चिनी ऍप्सवर भारताने बंदी घातल्याचे जाहीर केले. या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केला आहे. या सर्व ऍप्सपासून संपूर्ण राष्ट्राला धोका आहे, हे आपल्याला माहिती होत तर, मग या कंपन्या भारतात का चालवल्या गेल्या, असा सवाल संजय राऊत यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

सीमेवरील तणाव व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी चिनी ऍपविषयी दिल्यानंतर केंद्राने 59 चिनी ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय झाला. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचे हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न केला. भारतात टीक-टॉक सारख्या 59 कंपन्या आहेत. त्यावर बंदी घालण्यात आली आहे. या ऍप्समुळे संपूर्ण राष्ट्राला धोका आहे. राष्ट्रीय सुरक्षेतेला धोका आहे. समाजाला धोका आहे, हे आपल्या माहिती होते तर, मग या कंपन्या इतक्या दिवसांपासून भारतात का चालवल्या गेल्या, असे संजय राऊत म्हणाले आहेत. हे देखील वाचा- अनलॉक-2 म्हणजे काय? विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र सरकारला सवाल

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी काही दिवसांपूर्वीच 52 धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, टिक-टॉक, यूसी ब्राऊझर, झेंडर, शेअर इट, क्लीन मास्टर यांसारख्या ऍप्सचा यात समावेश आहे.

130 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने 59 मोबाइल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकरर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्याचा डेटा भारताबाहेरच्या परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अ‍ॅपही बंद केले पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.