Waldhuni River: ठाण्यात वालधुनी नदीचे पाणी अचानक झाले रक्तासारखे लाल; माहिती देणाऱ्याला 1 लाखाचे बक्षीस जाहीर
Waldhuni River (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यात, वालधुनी नदीचे (Waldhuni River) पाणी अचानक रक्ताच्या रंगासारखे लाल दिसू लागले आहे. या गोष्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नदीकाठाजवळ राहणाऱ्या उल्हासनगर (Ulhasnagar) व अंबरनाथ (Ambernath) टाउनशिपच्या रहिवाशांनी या नदीत विषारी रसायने (Poisonous Chemicals) सोडले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे केवळ पाणीच लाल झाले नाही, तर लोकांना या रसायनांमुळे विष दिले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. उल्हासनगरच्या नगरसेवकांनी, टाउनशिपमधून जाणार्‍या नदीत औद्योगिक कचरा डंप करणाऱ्याची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

आजूबाजूच्या लोकांच्या मते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (Maharashtra Pollution Control Board) वारंवार तक्रारी केल्या असूनही, पोलिस आणि पालिका अधिकारी यावर कारवाई करत नाहीत. डिसेंबर 2014 मध्येही त्या नदीच्या आसपास राहणाऱ्या सुमारे 600 रहिवाशांना अशाच अडचणींचा सामना करावा लागला होता. नदीकाठी राहणाऱ्या बहुतेक लोकांना उलट्या व अस्वस्थता वाटत होती. त्यावेळी काही लोकांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने, तसेच इथली हवा प्रदूषित असल्याने त्या काळात बरेच लोक तेथून स्थलांतरित झाले होते.

याप्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता, परंतु त्यानंतर त्याचे काही होऊ शकले नाही. तेव्हापासून तेथील रहिवाशांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती की, त्यांनी गुजरातमधील वापी आणि पनवेल जवळील रसायनी येथून आणण्यात येणारा रासायनिक कचरा नदीत टाकण्यावर रोख लावावी. उल्हासनगर आणि अंबरनाथमधील नद्यांमध्ये अशा प्रकारचे अनेक रासायनिक कचऱ्याचे टँकर टाकले जातात, त्यामुळे परिसरातील धूर व कधी कधी पाणी लालसर होते. (हेही वाचा: सोलापूर: कारखान्यात विषारी वायूची गळती झाल्याने 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू)

इंडिया टुडेशी बोलताना उल्हासनगरचे नगरसेवक टोनी सिरवाणी म्हणाले, 2014 मध्ये शेकडो लोकांचे नुकसान झाले होते परंतु तरी या ठिकाणी कचरा टाकणे थांबले नाही. टँकर माफिया धोकादायक रसायने नद्यांमध्ये टाकत असतात. या महिन्यात तेथील रहिवाशांना डोळ्यांना जळजळ, खाज सुटणे, श्वास घेण्यास त्रास, उलट्या होणे आणि मळमळ अशा समस्यांचा सामना करावा लागला. रहिवाशांचा आरोप आहे की टँकर चालक काही स्थानिकांना पैसे देतात आणि त्यांच्यामार्फत ही विषारी रसायने नदीत टाकतात.