प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

सोलापूर (Solapur) जिल्ह्यात मिथेन गॅसची टाकी (Methane Gas Tank) पडून विषारी वायूची (Toxic Gas) गळती झाल्याने 2 कामगारांचा (Workers) गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याशिवाय या घटनेत विषारी वायूमुळे 8 कामगार अस्वस्थ झाले. सध्या या कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी रात्री घडली. प्राप्त माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते अॅग्रो इंडस्ट्री कारखान्यात मिथेन गॅसची टाकी खाली पडली. टाकीचा आवाज आल्यानंतर कारखान्यातील काही कामगार टाकीजवळ गेले. परंतु, त्यावेळी टाकीतून विषारी वायूची गळती झाली होती. विषारी वायू गळती झाल्यामुळे तेथील कामगारांना त्रास होऊ लागला. यातील काही कामगारांना मळमळ आणि उलट्या झाल्या. विषारी वायू गळतीमुळे कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यातील काही कामगारांना चक्कर आली. त्यानंतर कारखान्यातील इतर कामगारांनी बेशुद्ध कामगारांना रुग्णालयात दाखल केलं. (हेही वाचा - कौतुकास्पद! भारतीय शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे यांची लष्करात लेफ्टनंट पदी नियुक्ती)

दरम्यान, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी यातील दोन कामगारांचा मृत्यू झाला. त्यानंतर इतर 8 कामगारांना रुग्णालयात उपचारासांठी दाखल करण्यात आले. सध्या या कामगारांची प्रकृती स्थिर आहे. कारखान्यात झालेल्या वायूगळतीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातचं अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि विषारी वायू गळीत थांबवली.

मे महिन्यात आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळ आर. आर. वेंकटापूरम परिसरात एलजी पॉलिमर्स कंपनीच्या प्लांटमधून विषारी वायूची गळती झाल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला होता. या वायू गळतीमुळे शेकडो नागरिक अस्वस्थ झाले होते.