महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नाव आता 'महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ' (Maharashtra State Board of Skill Development Examination) असे करण्यात आले आहे. याबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी घोषणा केली आहे. राज्यातील कौशल्य विकासाला गती देऊन या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. कौशल्य विकास विभागामार्फत अधिकाधिक तरुणांना विविध अभ्यासक्रमांमधून प्रशिक्षित करुन त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात येतील, असे आवाहनदेखील नवाब मलिक यांनी केलं आहे.
व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळा अंतर्गत विविध गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार एकूण 292 अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम राज्यामध्ये जिल्हा, तालुकास्तरावर, ग्रामीण भागात मंडळाने मान्यता दिलेल्या 1084 संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे दरवर्षी 50 ते 60 हजार विद्यार्थी प्रवेश घेतात. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा या मंडळामार्फत घेण्यात येते. उत्तीर्ण उमेदवारांना शासनाच्या वतीने मंडळामार्फत प्रमाणपत्र देण्यात येते. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra Police: गेल्या 48 तासात 222 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण, तर 3 जणांचा मृत्यू)
महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाच्या नामकरणाचा निर्णय. आता ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ’ (Maharashtra State Board of Skill Development Examination) असे नवे नाव असणार- कौशल्य विकास मंत्री @nawabmalikncp यांची माहिती pic.twitter.com/WT0hNfAtMy
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 10, 2020
कौशल्य विकास विभागामार्फत घेण्यात येणारे अभ्यासक्रम रोजगार आणि स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यासाठी वरदान ठरत आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इयत्ता दहावी ही शैक्षणिक अर्हता असलेल्या 2 वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना 'पदविका अभ्यासक्रम' अशा नावाने प्रमाणपत्र देण्यात येते, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करुन विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारास चालना मिळण्याच्या दृष्टीने व्यवसायभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविण्यात येतात. कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रभावी व वेगवान अंमलबजावणीसाठी या परीक्षा मंडळामार्फत कामकाज केले जाते, असंही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं आहे.