महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये व्हायरस; लिंक उघडल्यावर सुरू होतो कँडीक्रश गेम
Virus in Mobile Link of Mahatma Phule Farmers Debt Relief Scheme (PC- File Photo)

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या (Mahatma Jyotiba Phule Farmer Loan Waiver Scheme) मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही लिंक उघडल्यानंतर त्यावर कँडीक्रश गेम सुरू होत आहे. किसान पोर्टलवरून (KISSAN Portal) शेतकऱ्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये ही लिंक देण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. यासंदर्भात एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिणीने वृत्त दिले आहे.

शेतकऱ्यांना किसान पोर्टच्या माध्यमातून हवामान, पावसाचा अंदाज, शासकीय योजना, पिकांवरील रोग, पिकांवरील रोगांवर उपाय, तापमान इत्याहीबाबत माहिती देण्यात येते. या पोर्टलवरून शेतकऱ्यांना कर्जमाफीसंदर्भात एसएमएस पाठवण्यात आला होता. परंतु, आता या लिंकवर क्लिक केल्यास प्रसिद्ध कँडीक्रश गेम सुरू होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (iहेही वाचा - मुंबई महापालिकेच्या माजी इंजिनिअर अधिकाऱ्याच्या घरावर ईडी कडून छापेमारी, दुबईत प्रॉपर्टी असल्याचा खुलासा)

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. याबाबत 27 डिसेंबर रोजी राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय (GR) जारी केला होता. या कर्जमाफी योजनेनुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान कर्ज घेऊन त्याचं पुनर्गठन केलं आहे आणि ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकित आहे, अशा शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे.

30 सप्टेंबर 2019 रोजी शेतकऱ्यावरील कर्जाच्या थकबाकीची रक्कम 2 लाख रुपयांहून अधिक असल्यास त्याचे कर्ज माफ होणार नाही. तसेच राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज माफ होणार आहे. ठाकरे सरकारने या कर्जमाफी योजनेत अनेक अटी घातल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.