Under Qualified and Fake Doctors: बीएमसीच्या रुग्णालयात अपात्र आणि बनावट डॉक्टरांची नियुक्ती; अनेक मृत्यूंची शक्यता, Jeevan Jyoti Trust विरोधात एफआयआर दाखल
Doctor प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

मुंबईतील (Mumbai) मुलुंड (प.) येथील बीएमसीच्या (BMC) एमटी अग्रवाल रुग्णालयात (MT Agrawal Hospital) अपात्र आणि बनावट डॉक्टरांची (Under Qualified and Fake Doctors) पोस्टिंग केल्याबद्दल 'जीवन ज्योती ट्रस्ट'च्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अशा डॉक्टरांच्या पोस्टिंगमुळे अनेक रुग्णांचे मृत्यू झाले असावेत अशी शक्यता वर्तवली गेली आहे.

साधारण 17 फेब्रुवारी ते 22 नोव्हेंबर 2018 या नऊ महिन्यांच्या कालावधीत हॉस्पिटलच्या आयसीयु (ICU) मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने 149 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे, असे स्थानिक कार्यकर्ते गोल्डी शर्मा यांनी दिलेल्या माहिती अधिकाराच्या उत्तरात म्हटले आहे.

याआधी 4 जून 2019 रोजी गोल्डी शर्मा यांचा भाऊ राजकुमार शर्माचा आयसीयुमध्ये मृत्यू झाला होता, त्यानंतर शर्मा यांनी हॉस्पिटलमधील अनियमिततेची चौकशी सुरू केली. त्यात अनेक धक्कादायक तथ्ये समोर आले. हॉस्पिटल चालवण्यासाठी बीएमसीद्वारे ट्रस्टला 8,83,30,000 रुपये इतकी मोठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये एमबीबीएस, बीएमएस आणि बीएचएमएस पदवी असलेल्या मात्र अपात्र डॉक्टरांना नियुक्त केले गेले. महत्वाचे म्हणजे यातील काही डॉक्टरांच्या पदव्या खोट्या असण्याचीही शक्यता वर्तवली गेली आहे.

यापैकी एक बोगस डॉक्टर परवेझ अझीझ शेख याच्याविरुद्ध मालवणी, मुंबई, आणि ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल आहे. तथाकथित ‘डॉक्टर’ शेख याला आयपीसीच्या कलम 419, 420 आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या कलम 33, 34 आणि 35 अंतर्गत तोंड द्यावे लागत आहे. आयसीयुमध्ये तैनात डॉ. अविनाश प्रसाद, डॉ. राजेश आणि डॉ. पूजा अग्रवाल यांची पात्रता आणि पदव्या देखील चौकशीच्या कक्षेत आहेत. (हेही वाचा: पंचावन्न वर्षांवरील पोलीस वाहतूक नियोजनासाठी रस्त्यावर नसावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश)

तक्रारीनंतर 11 मे 2023 रोजी मुलुंड पोलिसांनी आयपीसीच्या कलम 302, 307, 416, 419, 426, 465, 471, 112, 117, 120(b), 33 आणि 34 अंतर्गत वीरेंद्र यादव, ज्योती ठक्कर, जे.सी वकील, रतनलाल जैन, दीपक जैन, दीप्ती मेहता आणि जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.