शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज 60 व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान असलेले उद्धव ठाकरे हे तिसरे शिवसेना नेते आहेत. दरम्यान यंदा महाराष्ट्र राज्य सह जगभरात कोरोना संकट आहे. त्याची दाहकता पाहता उद्धव ठाकरे यांनी आज वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केले आहे. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची धुरा स्वीकारून पक्ष वाढवण्याचं काम उद्धव ठाकरे करत असल्याने राज्यातील तमाम शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांचा शब्द अंतिम आहे. दरम्यान शिवसेना नेते ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरेंचा प्रवास लक्षवेधी ठरला आहे.
बिंधुमाधव, जयदेव ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांचे तिसरे अपत्य. त्यांचा जन्म 27 जुलै 1960 ला झाला. हळवं पण संयमी नेतृत्त्व अशी उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्याविषयी काही खास गोष्टी!
उद्धव ठाकरे यांच्या बद्दल खास गोष्टी
- उद्धव ठाकरे यांचा राजकारणापेक्षा अधिक कल हा कलाक्षेत्रामध्ये होता. त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट मधून शिक्षण घेतले असून फोटोग्राफी हा त्यांचा जिव्हाळाचा विषय होता.
- उद्धव ठाकरे यांच्या फोटोग्राफीमधून टिपलेले महाराष्ट्रातील गडदुर्ग आणि पंढरीची वारी आता पुस्तकरूपी लोकांसमोर आहे. 'महाराष्ट्र देशा' हा गडदुर्गांचा तर 'पहावा विठ्ठल' हा पंढरीच्या वारीचा त्यांचा छायाचित्र संग्रह आहे.
- कलाप्रेमी उद्धव ठाकरे पुढे राजकारणात वळले. घरामधील राजकारणाचा वारसा त्यांनी पुढे जपला. 2003 साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. पुढे राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दुरावा आला आणि राज ठाकरे शिवसेनेपासून दूर झाल्यानंतर पक्षाची जबाबदारी बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी समर्थपणे सांभाळली.
- 2006 साली त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्र सामना च्या संपादकपदाची सूत्र स्वीकरली. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या पदाचा राजीनामा दिला आणि पत्नी रश्मी ठाकरे यांना ती जबाबदारी दिली.
- उद्धव ठाकरे हे 'शिवसेना' सारख्या एका 'बंडखोर' विचारधारेचा पुरस्कार करणार्या एका पक्षाचं नेतृत्त्व करत असले तरीही त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, संयमी आहे. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांनी पक्षांचं कार्याध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर पक्षाला शिस्त लावण्याचं काम केलं. असं जाणकार सांगतात.
- राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज्यातील शिवसेना कमकुवत होनार असं वाटत असतानाच उद्धव ठाकरेंनी आपली कार्यक्षमता, नेतृत्त्वगुण यांची चुणूक दाखवली. महापालिका आणि विधानसभा निवडणूकांमध्ये शिवसेनेला राजकीय यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 2014साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे 63 आमदार निवडून आणले. आणि हळूहळू विस्कटलेली शिवसेनेची राजकीय घडी पुन्हा बसवायला सुरूवात झाली.
- ठाकरे कुटुंब निवडणूकीच्या रिंगणात प्रत्यक्ष न उतरता राजकारण करत होते. मात्र 2019 च्या विधानसभेत विचित्र राजकीय पेचातून मार्ग काढताना सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदाची माळ उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात पडली. सध्याच्या विधानसभेत उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे ही जोडी मंत्रिमंडळामध्ये आहे.
- उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 ला महाराष्ट्र राज्याचे 29वे मुख्यमंत्री झाले तर 14 मे 2020 ला उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली. पुढे सहा वर्ष ते विधानपरिषदेचे सदस्य असतील.
- उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदी पोहचवण्यामध्ये त्यांंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची देखील महत्त्वाची भूमिका समजली जाते.
- सी व्होटर संस्थेनं काही महिन्यांपूर्वी देशातील नेत्यांच्या लोकप्रियतेचा आढावा घेत यादी जाहीर केली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये 5वा आहे.
सध्या कोरोना संकटकाळातही उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या संयमी भूमिकेचं सामान्यांकडून कौतुक होत आहे. प्रशासानाचा अनुभव नसल्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचा, महाराष्ट्राचा गाडा उद्धव ठाकरे कसा हाकतील? अशी दबक्या आवाजात चर्चा होती मात्र
त्यांच्या नेतृत्त्व गुणांनी ही टीका देखील आता हे खोडून काढण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत.