Lok Sabha Election Allotment: उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात फोनवर चर्चा, लोकसभा जागावाट अंतिम टप्प्यात
Uddhav Thackeray And Rahul Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाविकासआघाडीतील प्रमुख असलेल्या शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस पक्षात लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) जागावाटपावरुन तीव्र रस्सीखेच सुरु आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी बुतांशी जागांचे वाटप झाले आहे. मात्र, शेवटच्या काही आठ ते दहा जागा आहेत. ज्यावर मविआला अद्यापही तोडगा काढता आला नाही. परिणामी या पक्षांचे प्रमुख नेते असलेल्या शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात अंतिम बोलणी सुरु असल्याचे वृत्त आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात फोनवरुन जवळपास एक तास ते दीड तास चर्चा झाल्याचे समजते. मविआ ही विरोधकांच्या राष्ट्रीय पातळीवर स्थापन केलेल्या 'इंडिया' आघाडीचा घटक आहे.

मुंबईतील जागांवर तिढा कायम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण 48 पैकी जळपास 40 जागांवर कोणता पक्ष लढणार हे स्पष्ट झाले आहे. आता केवळ उर्वरीत आठ जागांचा प्रश्न बाकी आहे. यात प्रामुख्याने मुंबईतील सहा जागांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) मुंबईतील लोकसभेच्या चार जागांवर उमेदवार उतरवू इच्छिते. तर काँग्रेसही काही जागा मागते आहे. त्यामुळे निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी राहुल गांधी पुढे आले आहेत. ते सध्या 'भारत जोडो न्याय' यात्रेमध्ये व्यग्र आहेत. या यात्रेदरम्यानच त्यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुखांशी संवाद साधला. (हेही वाचा, Sharad Pawar Party Symbol: 'वाजवा तुतारी हटवा गद्दारी', शरद पवार यांच्या निवडणूक चिन्हाचा सोशल मीडियावर आवाज, सुप्रिया सुळे यांनी सांगितली त्रिसूत्री)

काँग्रेसकडून तीन, ठाकरेंकडून चार जागांवर दावा

काँग्रेसमधील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, काँग्रेसला मुंबईतील एकूण सहा पैकी तीन जागा लढायच्या आहेत. ज्यामध्ये मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या जागांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला पुढे आलेल्या आकड्यांनुसार मुंबईतील चार जागांसह उद्धव ठाकरे 18 जागा लढणार आहेत. ज्यामध्ये मुंबई दक्षीण, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई दक्षिण मध्ये या जागांचा समावेश आहे. दरम्यान, एकाच मतदारसंघावर दोन्ही बाजूंनी दावा सांगण्यात आल्याने पेच निर्माण झाला आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024: राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' UP मध्ये दाखल)

नव्या आघाडीमुळे जागावाटप करताना आव्हान

उद्धव ठाकरे यांच्यासाठी महाविकासआघाडीतील जागावाटप अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. कारण या आधी ठाकरे यांचा पक्ष आणि काँग्रेस, राष्ट्रवादी हे वैचारिकदृष्ट्या परस्परविरोधी पक्ष मानले जात होते. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या पक्षांनी कधीही युती, आघाडी केली नव्हती. परिणामी या पक्षांसाठी जागावाटप हा अत्यंत आव्हानात्मक विषय असणार आहे. केवळ उद्धव ठाकरेच नव्हे तर तो राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासाठीही बऱ्यापैकी आव्हानात्मक मुद्दा असणार आहे. हे सर्व पक्ष लोकसभा निवडणूक 2019 मध्ये परस्परांविरोधात लढले होते. तरीसुद्धा या पक्षांनी 40 जागांवर समाधानकारक तोडगा काढला आहे. (हेही वाचा, Ramesh Chennithala Meets Uddhav Thackeray: महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, जागावाटपावर केली चर्चा)

पक्षांतर आणि फोडाफोडीमुळे राजकारणात गुंता

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकसंध होती. त्या वेळी या पक्षाने महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 पैकी 22 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी 18 जागा त्यांनी निवडूण आणल्या होत्या. ज्यामध्ये मुंबईतील जागांचाही समावेश होता. त्यांच्या पक्षाची भाजपसोबत जवळपास 25 वर्षांची युती होती. भाजपचा हा सर्वात जूना मित्रपक्ष होता. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली. 2019 मध्ये तर शिवसेनेने महाविकासआगाडी स्थापन करुन थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सत्ता स्थापन केली. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर महाविकासआघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितला. जो निवडणूक आयोगाने मान्य केला आणि त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ताही स्थापन केली.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्येही पडझड झाली आहे. काँग्रेस फुटली नसली तरी, अशोक चव्हाण यांच्यारुपात काँग्रेसचा मोठा चेहरा भाजपमध्ये गेला आहे. तर मिलींद देवरा यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने मुंबई काँग्रेसला धक्का बसला आहे. पक्षांतर्गत राजकारण आणि फोडाफोडीच्या उद्योगामुळे महाराष्ट्रातील राजकारण कमालीचे गुंतागुंतीचे झाले आहे.