रेल्वे प्रवासादरम्यान स्टंट (Railway Stunt) करणाऱ्या स्टंटबाजांमुळे इतर प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण होतो. त्यामुळे या स्टंटबाजांना चाप लावण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. यापुढे रेल्वे, अथवा मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना कोणी स्टंटबाजी केल्यास रेल्वे सुरक्षा दल (Railway Protection Force ) त्यावर कडक कारवाई करणार आहे. इतकेच नव्हे तर, आशा स्टंटबाजांवर तब्बल पाच वर्षांची शिक्षाही ठोठावली जाणार आहे. शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कलमानुसार रेल्वे सुरक्षा दल (RPF) ही कारवाई करणार आहे.
कोण असतात हे स्टंटबाज?
रेल्वे प्रवास, अथवा मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुण, तरुणी यांचा समावेश असतो. अनेकदा काही अल्पवयीन मुलेही असे स्टंट करताना दिसतात. कधी गर्दूले, फेरीवाले, दारुडे, नाशापाणी करुन प्रवास करणारे प्रवासी, बेकार तरुण-तरुण तरुणी, 15 चे 30 वर्षे वयोगटातील मुलं-मुली आदी मंडळींचा स्टंटबाजांमध्ये प्रामुख्याने समावेश दिसतो.
स्टंटचे काही प्रकार
रेल्वे प्रवास, अथवा लोकल गाडीतून प्रवास करताना प्रामुख्याने गाडीच्या दरवाजाजवळ उभे राहणे, दरवाजातील खांबाला एक हात पकडून दुसऱ्या हताने रुळाशेजारील वीजेच्या खांबांना स्पर्ष करणे. पाय घासून जाताना पायानेच अन्य प्रवाशाला स्पर्श करणे, फलाटावरील प्रवाशाला हाताने मारणे, चालत्या किंवा उभ्या असलेल्या काढीच्या छतावर उभे राहणे, रेल्वे रुळावर उभे राहून सेल्फी काढणे, रेल्वे रुळावर टीक टॉक व्हिडिओ बनविणे, गाडी स्टेशनदरम्यान उभी असताना उडी मारुन बाजूच्या गाडीत जाणे, समोरुन येणाऱ्या दुसऱ्या गाडीतील प्रवाशांवर हातातील वस्तू फेकणे, अशा प्रकारचे ही मंडळी स्टंट करत असतात.(हेही वाचा, वाहतुकीचे नियम मोडल्यास कडक कारवाई होणार, जाणून घ्या नवे नियम)
रेल्वे सुरक्षा कर्मचारी कशी करणार कारावाई?
रेल्वे सुरक्षा दल कलम 153 अन्वये स्टंटबाजांवर कारवाई करणार. प्रवाशांच्या जीविताला हेतुपुरस्सर धोका उत्पन्न करणे. तसेच, स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणे आदी गोष्टींना आळा घालण्यासाठी या कलमाचा वापर केला जातो. या कलमात या आधी स्टंट करणाऱ्या व्यक्तीला सध्या केवळ दंड आकारण्याची किंवा एक ते तीन महिन्यांपर्यंत शिक्षा भोगण्याची तरतूद होती. मात्र आता या नव्या कलमानुसार कारवाई केल्यास दोषी व्यक्तीस पाच वर्षे तुरुंगवा भोगावा लागतो. या नव्या कलमात तसा उल्लेख आहे. (हेही वाचा, मुंबई: चेंबूर ते वडाळा दरम्यान लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या दोघांना अटक)
दरम्यान, आतापर्यंत जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत मध्य रेल्वेने कारवाई करत तब्बल 339 स्टंटबाजांना पकडले आहे. या स्टंटबाजांकडून 1 लाख 28 हजार इतका दंडही वसूल करण्यात आला आहे. तर, एका स्टंटबाजाची थेट रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. प्रामख्याने हार्बर रेल्वे लाईनवर जीटीबी नगर ते चुनाभट्टी, चेंबूर, गोवंडी, वाशी तर मध्य रेल्वे मार्गावर कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, दिवा, कांजुरमार्ग, भांडुप, मुलुंड, ठाणे अशा उपनगरी लोकलमध्ये स्टंटबाजांची संख्या अधिक आढळते.