Rain (फोटो सौजन्य - फेसबुक)

Maharashtra Weather Forecast: चक्रीवादळामुळे तामिळनाडू (Tamil Nadu) आणि केरळ (Kerala) मध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असून हवामानात सतत बदल होत आहेत. याचा परिणाम मुंबई आणि उपनगरांमध्ये देखील होत आहे. राज्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असून गेल्या चोवीस तासांपासून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालेला नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

पुणे, कोल्हापूर, सांगलीसह 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता -

आज पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि लातूर जिल्ह्यांसह आज पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसाने आधीच शेती पिकांचे नुकसान केले असून आंबा आणि काजू बागायतदारांना हवामानाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तथापी, पुढील पाच दिवसांत तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी बदलत्या हवामानामुळे थंडीत वाढ होण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -Delhi Air Pollution: दिल्ली वायुप्रदूषण, हवेच्या गुणवत्तेची गंभीर श्रेणी कायम, BS-III पेट्रोल, BS-IV डिझेल चारचाकी वाहनांवर बंदी)

पुणे, सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण -

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट कमी झाली असली तरी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस सुरू आहे. पुण्यात आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच तापमान कमाल 32 अंश सेल्सिअस आणि किमान 22 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. साताऱ्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. साताऱ्यात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील. तथापी, सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये नुकतीच पावसाने हजेरी लावली असून आज काही भागात हवामान अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असेल.

मराठवाड्यात कोरडे हवामान -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पिके, फळबागा, भाजीपाला आणि फुलांच्या पिकांसाठी पाण्याच्या वापराचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.