पश्चिम रेल्वे मार्गावरील 'मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानका'चं (Mumbai Central Station) नामांतर करण्यास ठाकरे सरकारने (Thackeray Government) मंजुरी दिली आहे. या स्थानकाला मुंबईचे आद्य शिल्पकार 'नाना शंकरशेठ' (Nana Shankar Sheth) यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबई सेंट्रल टर्मिनसचे ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ (Nana Shankar Sheth Terminus) स्टेशन असे नामकरण करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नामकरण करण्याची मागणी केली होती. आता या नावाला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यास हे स्थानक ‘नाना शंकरशेठ टर्मिनस' या नावाने ओळखले जाईल. (हेही वाचा - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वीणा वर्ल्डच्या पुढील एका महिन्यातील सर्व आंतरराष्ट्रीय टूर्स रद्द; 13 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
या अगोदरही मुंबईतील विविध स्थानकांचे नाव बदलण्यात आले आहे. ‘एल्फिन्स्टन रोड’ स्थानकाचे नाव बदलून ते प्रभादेवी असे करण्यात आलं होतं. त्यानंतर आता मुंबई सेंट्रेल रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आलं आहे. या रेल्वे स्थानकाला ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ असं नाव देण्यामागे महत्त्वाचं कारण आहे. नाना शंकरशेठ हे भारतातील पहिल्या रेल्वे कंपनी ‘ग्रेट ईस्टर्न रेल्वे’चे पहिले संचालक होते. त्यामुळे त्यांना ‘भारतीय रेल्वेचे पितामह’ असेही म्हटले जाते.
नाना शंकरशेठ हे विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी होते. ते व्यावसायिक असले तरी त्यांचे सामाजिक कार्य महत्त्वाचे आहे. त्यांनी आपल्या संपत्तीतील काही हिस्सा सामाजिक कामासाठी दान केला होता. नाना शंकरशेठ यांनी सती बंदी च्या कायद्यालाही पाठिंबा दिला होता. तसेच 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी शाळा सुरु केली होती.