छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे, त्याच्या त्यागामुळे मराठा साम्राज्याच्या इतिहास ओळखला जातो. इतकच नव्हे तर या छत्रपती महाराजांसोबत सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले त्यांचे मावळे, सरदार यांनाही इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. शिवरायांचे असे निस्सीम मावळे ज्यांची कर्तव्यनिष्ठा, स्वराज्याविषयी असलेली तळमळ पाहून शिवरायांच्या अंगी दहा हत्तींचे बळ यायचे. यातीलच एक नाव जे लोक कधीच विसरू शकत नाही. ते म्हणजे वीरयोद्धा तानाजी मालुसरे (Tanhaji Malusare). स्वराज्याचा ध्यास लागलेला असा योद्धा ज्याने चक्क आपल्या मुलाचे लग्न सोडून कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी शत्रूसाठी चार हात करण्यासाठी घराबाहेर पडला. त्यांनी आपल्या कामगिरीने हा किल्ला जिंकला खरा मात्र शत्रूशी झालेल्या लढतीत त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.
अशा या शूर योद्धाच्या शौर्यगाथेवर आधारित 'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून तानाजी मालुसरें विषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना लागली असेल. म्हणूनच आज आम्ही सांगणार आहोत त्यांच्या माहित नसलेल्या '10' आश्चर्यकारक गोष्टी:
1. नरवीर तानाजी मालसरे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील गोडोली गावात झाला. तानाजी हे छत्रपतींचे बालपणापासूनचे मित्र होते.
2. जिजाबाईंच्या इच्छेखातर कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना दिली. त्यावेळी आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते. मात्र स्वराज्याच्या ध्यासाने झपाटून निघालेल्या तानाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाचे लग्न अर्धवट सोडून 'आधी लगीन कोंढाण्याचे मग आमच्या रायबाचे' असे म्हणत मोहिमेवर गेले.
3. या गडाचे किल्लेदार उदयभान राठोड आपल्या 1500 मुघल सेनेसह या गडाचे रक्षण करत होते. असे असताना तानाजी मालुसरे यांनी आपल्या केवळ 300 मावळ्यांना घेऊन या गडावर चाल करुन गेले.
4. यावेळी त्यांनी सुरुवातीला शक्ती ऐवजी युक्तीचा वापर करत शत्रूचा डोळा चुकवत रात्रीच्या वेळी द्रोणागिरीच्या कडा चढून शत्रूवर वार केला.
5. रात्रीच्या वेळी हा कडा चढणे म्हणावे तितके सोपे नव्हते अशा वेळी त्यांनी आपल्या घोरपडीला वर पाठवून तिच्या शेपटीला दोर बांधला आणि मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले आणि मुघल सेनेवर चाल केली.
6. मुघल सेनेसोबत तानाजी आणि त्यांचे मावळे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले यात तानाजींच्या हातातील ढाल देखील पडली मात्र उदयभानला निपचित पाडूनच रक्तबंबाळ झालेल्या तानाजींनी आपले प्राण सोडले.
7. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना 4 फेब्रुवारी 1670 रोजी घडली. मात्र तानाजींच्या मृत्यूची बातमी ऐकताच 'गड आला पण सिंह गेला' असे उद्गगार शिवरायांच्या तोंडून निघाले.
8. त्यांच्या शौर्याने कृतकृत्य झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला 'सिंहगड' असे नाव दिले.
9. तर दुसरीकडे ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली त्या मार्गाला 'मढेघाट' या नावाने ओळखले जाऊ लागले.
10. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले आहे.
तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा ऐकून एकच गोष्ट सांगावीशी वाटते, 'झाले बहु, होतील बहु, पण या सम हा'.