![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/04/Swedish-Woman-in-Nagpur_AC-380x214.jpg)
पेट्रिशिया एरिक्सन (Patricia Eriksson), एक 41 वर्षांची स्वीडीश महिला नागपूर (Swedish Woman in Nagpur) येथे दाखल झाली आहे. तिला आपल्या जैविक आईचा (Biological Mother) शोध घ्यायचा आहे. तिला एकदा भेटावे आणि कडकडून मिठी मारावी, अशी तीव्र भावना झाल्याने ती भारतात दाखल झाली आहे. पेट्रिशिया हिस तिच्या जन्मदात्या आईने 40 वर्षांपूर्वी बेवारसपणे सोडून दिले होते. हे बेवारस मूल एका दाम्पत्याने दत्तक घेतले. त्याचे संगोपण केले. त्याला वाढवले आणि आज हे मूल म्हणजेच 41 वर्षांची पेट्रिशिया एरिक्सन होय. तिच्या शोधाला यश येईल की नाही माहिती नाही. मात्र, आपल्या आईबद्दलची नैसर्गिक ओढ तिला सातासमुद्रापार घेऊन आली आहे. ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पेट्रिशिया एरिक्सन हिचा जन्म 23 वर्षीय कुमारी मातेच्या पोटी नागपूर येथील डागा रुग्णालयात झाला. ते साल होते फेब्रुवारी 1983. तिची आई तिला सोडून गेली. या लहान बाळाचे करायचे काय? हा प्रश्न तेव्हा रुग्णालयालाही पडला होता. त्यामुळे कायदेशीर सल्ला आणि तत्कालीन व्यवस्था यानुसार रुग्णालयाने हे मूल एका अनाथाश्रमाकडे सोपवले. या आश्रमातून या मुलीला एका स्विडीश दाम्पत्याने दत्तक घेतले. हे दाम्पत्य मूळचे स्वीडन येथील राहणाले. ते तिला सोबत घेऊन गेले. तेव्हापासून पेट्रिशिया स्वीडनमध्येच राहते. तिचे नागरिकत्वही तिथलेच आहे. दरम्यान, आपल्या आईच्या शोधासाठी ती यापूर्वीही नागपूरला येऊन गेली आहे. आईच्या शोधात तिची ही दुसरी नागपूर भेट आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पेट्रिशियाचा आपल्या आईचा शोध सुरुच आहे. अगदी सोमवारीही (1 एप्रिल) ती आपल्या आईचा पूर्ण नागपूरभर शोध घेत होती. मात्र, त्यात तिला यश आले नाही. तिची मोहीम यशस्वी होऊ शकली नाही.
स्वीडीश दांम्पत्याने पेट्रिशियाची चांगली देखभाल आणि संगोपण केले असले तरीही तिला आपल्या नैसर्गिक आईचा शोध घ्यायचा आहे. तिला आईला भेटायचे आहे. तिच्याबद्दल आणि तिचे पालनकर्ते असलेल्या दाम्पत्याबद्दल तिला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यासाठी तिला तत्कालीन कागदपत्रेही मिळवायची आहेत. जेणेकरुन दत्तक जाण्यापूर्वी जन्म देणाऱ्या मूळ आईचा शोध घेता येईल.
नागपूर येथील अंजली पवार यांच्या सोबत पेट्रीसिया एरिक्सन (41) आपल्या आईचा शोध घेत आहे. रुग्णालयातील कागदपत्रे आणि तत्कालीन खाणा-खुणा यांद्वारे त्यांचा शोध सुरु आहे. खरेतर अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचणे आणि आई सापडणे हे तसे कठीणच आहे. पण त्यांचा शोध मात्र सुरु आहे.