Anant Geete | (Photo Credits: Facebook)

माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते अनंत गीते (Anant Geete) यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगण्याची शक्यता होती. मात्र, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी वेळीच खुलासा करत भूमिका स्पष्ट केल्याने सध्या तरी हे प्रकरण निवळल्याचे चिन्ह आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी अनंत गीते यांच्या वक्तव्यावरुन हात झटकले आहेत. हे त्यांचे व्यक्तीगत विधानस असल्याचे दर्शवले आहे. तर राष्ट्रवादीतून केवळ खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी गीते यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटले होते अनंत गिते?

अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच थेट निशाणा साधला होता. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षाचे सरकार आहे. मुख्यमंत्री आपला आहे. असे असले तरी आपण फक्त शिवसेनेचाच विचार करायचा आहे. सरकार आघाडीचे आहे. शिवसेनेचे नाही. त्यामुळे आघाडीचे नेते सत्ता सांभाळतील. आपल्याला गाव सांभाळायचे आहे. आपण फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे. लोक अनेकांना नेते मानतात. जानता राजा म्हणतात. पण आपला नेता फक्त बाळासाहेब ठाकरे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच काँग्रेसच्या पाटीत खंजीर खुपसून केली आहे. श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते बोलत होते. (हेही वाचा, अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण? बारामतीत भाजपचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही करुन दिली आठवण)

संजय राऊत काय म्हणाले?

दरम्यान, अनंत गिते यांच्या वक्तव्याबाबत आपल्याला माहिती नाही. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे तीन पक्षांची मिळून एक व्यवस्था आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. प्रसारमाध्यमांनी अनंत गीते यांच्या व्यक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांनी खोदून विचारले असता आपल्याला गीते यांच्या वक्तव्याची कल्पना नसल्याचे राऊत यांनी म्हटले. हे सरकार बनवायचे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी ठरवले आहे. त्यामुळे हे सरकार 5 वर्षे टीकेल असे मात्र राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

सुभाष देसाई काय म्हणाले?

सुभाष देसाई यांनी गीते यांचे हे वक्तीगत मत असल्याचे स्पष्ट केले. राजकीय आखाड्यात काही लोक विधाने करतात. परंतू, ते त्यांचे व्यक्तीगत मत असल्याचे देसाई म्हणाले.

सुनील तटकरे काय म्हणाले?

अलीकडच्या काळात अनंत गीते यांची अवस्था राजकीयदृष्टया 'सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही' अशापध्दतीची झाल्यामुळेच वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी वक्तव्य केल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.