MSBSHSE SSC Exam 2020: महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरूवात होणार आहे. यावर्षी राज्यभरातील 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 मुले आणि 7 लाख 89 हजार 898 मुली आहेत. तसेच राज्यातील एकूण 4 हजार 979 केंद्रात एसएससी परीक्षा पार पडणार आहेत. महत्वाचे म्हणजे, परिक्षेचा काळ जवळ येताच विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. तसेच परिक्षेचे नियोजन कसे करायचे? असा प्रश्नही विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो. परिक्षा ही केवळ चाचणी नसून उज्जव भविष्य ठरवणारी एक सुवर्ण संधी आहे. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात अनेक परिक्षांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे घाबरण्यापेक्षा या परिक्षेला धैर्याने आणि खंबीरपणे सामोरे जाणे गरजेचे आहे. यासाठी खालील काही टीप्स विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले की, या परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार होता कामा नये, यासाठी गैर मार्गाशी लढा या उपक्रमाअंतर्गत, 273 भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक येथे 80 केंद्र संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी 65 हजार विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. हे देखील वाचा- Maharashtra SSC Exam 2020 Time Table: यंदा 10 वीची परीक्षा 3-23 मार्च; PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा दहावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक, mahahsscboard.maharashtra.gov.in वर अधिक माहिती
1) परीक्षेसाठी वेळेचे नियोजन-
परीक्षेला जाताना खूप आधी जाऊ नका, नाहीतर तिथल्या वातावरणामुळे तुम्ही अधिक नर्व्हस व्हाल. तसेच तिथे गेल्यावर पुन्हा पुन्हा नोट्स वाचत बसण्यापेक्षा शांत रहा. शांत रहाण्यासाठी काही वेळ दीर्घ श्वास घ्या व सोडा ज्यामुळे तुम्हाला अधिक फ्रेश वाटेल. पहिल्या पेपरच्या दिवशी 1 तास आधी तर, उर्वरित पेपरसाठी अर्धातास आधी परिक्षा केंद्रावर पोहचणे अधिक उत्तम ठरेल.
2) पोटभर नास्ता करा-
परीक्षेच्या काळात काही विद्यार्थी चिंतेमुळे सकाळी नास्ता करणे टाळतात, हे अत्यंत चुकीचे आहे. कारण उपाशी राहील्यामुळे तुम्हाला ऍसिडीटी, मळमळ, डोकेदुखी यांसारखा त्रास होऊ शकतो. ज्याचा परिणाम तुमच्या पेपर सोडवण्याच्या परफॉर्मन्सवर पडू शकतो. यासाठी परिक्षेला जाण्यापुर्वी घरातून नास्ता करुन जावे.
3) प्रश्नपत्रिका सावधपणे वाचा-
काही विद्यार्थी भरभर प्रश्नपत्रिका वाचतात आणि काही प्रश्नांची उत्तरे न आठवल्यास चिंता करत बसतात. त्याऐवजी शांतपणे प्रश्नपत्रिका वाचा आणि तुमच्या वेळेचे नियोजन करुन येत असलेली उत्तरे आधी लिहा. ज्यामुळे तुम्हाला इतर प्रश्नांची उत्तरे देखील वेळेत आठवतील. इतर मुले किती उत्तरपत्रिका घेतात अथवा तुमचा मित्र किती वेगाने पेपर सोडवत आहे, हे पाहत बसण्यापेक्षा तुमचा पेपर सोडवण्याकडे अधिक लक्ष द्या. त्याचप्रमाणे पेपर सोडवताना प्रत्येक प्रश्नानंतर थोडी जागा ठेवा ज्यामुळे नंतर त्या प्रश्नाच्या उत्तराबाबत तुम्हाला काही अधिक माहिती आठवली तर ती लिहिण्यासाठी तुमच्या पेपरमध्ये जागा असेल.
4) पेपरनंतर चर्चा करणे टाळा-
परिक्षा देऊन बाहेर पडल्यानंतर त्या विषयावर चर्चा करत बसू नका. तसेच निष्फळ गप्पा मारण्यासाठी परिक्षा केंद्राबाहेर न थांबता घरी निघून जा. परंतु, अनेकजण परिक्षा देऊन आल्यानंतर काय चुका झाल्या? आणि काय करायला हवे होते? यावर चर्चा करतात. यामुळे पुढील विषयांवर याचा परिणाम होण्याची शक्यता असते.
5) एकाच गोष्टीचा विचार करणे टाळा-
परिक्षा देऊन बाहेप पडल्यानंतर झालेल्या पेपरचा अधिक विचार करणे शक्य तो टाळा. महत्वाचे म्हणजे, जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले असेल तर, काहीच हरकत नाही. त्यावेळी शांत राहून याकडे दुर्लक्ष करा.
6) ब्रेक घ्या-
पेपरवरून घरी आल्यानंतर जेवण केल्यानंतर थोडासा आराम करा. त्यानंतरच पुढील पेपरची तयारी करा. त्यामुळे तुम्हाला पुढच्या पेपरचा आभ्यास करताना बरे वाटेल.
दहावीच्या परिक्षेत गेल्यावर्षी मुलींनी बाजी मारली होती. या परिक्षेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे दहावीचा निकाल जून महिन्याच्या सुरुवातीला लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.