शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन बाजूला होण्याचा निर्णय जाहीर केला आणि राजकीय वर्तुळाला धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena) पक्षातील नेत्यांनाही हा निर्णय काहीसा अकल्पीत असाच होता. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांनाही भावना अनावर झाल्या. राजकीय वर्तूळात मात्र शरद पवार यांच्या या घटनेमुळे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच त्यांच्या संपूर्ण हायातीत पक्षाचे नेतृत्व होते. मात्र, एका टप्प्यावर असे झाले की, पक्षाबाहेर लोकांसह पक्षातीलही काही लोकांनी दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच आरोप केले. हे आरोप अत्यंत टोकाचे होते. आरोप आणि टीकेला वैतागून बाळासाहेब ठाकरे यांनी निर्णय घेतला की, शिवसेनापक्षप्रमुख पदाचाच राजीनामा द्यायचा. त्यांनी हा निर्णय केवळ घेतलाच नाही तर थेट जाहीर केला. शिवसेना पक्षाचे मुखपत्र दैनिक सामनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भव्य मुलाखत छापून आली. अग्रलेख आणि बातम्याही आल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयाचा नेमका परिणाम झाला. महाराष्ट्रभरातून शिवसैनिकांचे जत्थेच्या जत्थे मातोश्री आणि शिवसेना भवनावर दाखल होऊ लागले. सर्व शिवसैनिकांनी बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा असे साकडे घातले. झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा मागे घेतला. बाळासाहेब ठाकरे यांचे विरोधक आणि पक्षांतर्गत स्पर्धकांची तोंडे बंद झाली. (हेही वाचा, Sharad Pawar: शरद पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडल्या 'या' महत्त्वाच्या घडामोडी)
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतची आठवण सांगितली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वेळच्या निर्णयाची चर्चा रंगली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला खरे. परंतू, शरद पवार हे मुरब्बी नेते आहेत. त्यामुळे ते कधी कोणता निर्णय घेतात आणि निर्णय फिरवतात याचा काहीच नेम नसतो. त्यामुळे पवार यांनी जाहीर केलेली भूमिका म्हणचे पक्का निर्णय की खेळी याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.