भारतीय जनता पक्ष हा नेहमी भगवान श्रीरामाच्या नावाने राजकारण करतो. मात्र भाजप नेत्यांनी प्रभू रामचंद्रांच्या आणि विठोबाच्या नावाने असलेल्या 10 देवस्थानांच्या जमिनी हडप केल्या असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तीन मुस्लिम देवस्थाने आणि सात हिंदू देवस्थानांच्या 513 एकर जमिनीच्या कागदपत्रांत फेरफार करुन, त्यावर खासगी नाव चढवले. तसेच त्याचे प्लॉटिंग करुन हजारो कोटींचा घोटाळा करण्यात आला, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नावाचा समावेश असल्याचा आरोप मलिक यांनी केला. राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील नेते राम खेडे यांनी आष्टी तालुक्यातील दहा देवस्थानांचा जमिन घोटाळा समोर आणला असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. यात मशीद आणि दर्गा इनामच्या तीन देवस्थानांच्या 213 एकर जमिनीचा समावेश आहे. मुर्शीदपूरची विठोबा देवस्थानची 41 एकर 32 गुंठे, खंडोबा देवस्थान 35 एकर, श्रीराम देवस्थान 29 एकर, कोयाड येथील श्रीराम देवस्थान 15 एकर,चिंचपूर रामचंद्र देवस्थान 65 एकर, बेळगाव खंडोबा देवस्थान 60 एकर आणि खडकत विठोबा देवस्थान 50 एकर अशी हिंदू देवस्थानांची 300 एकर जमीन खालसा केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद https://t.co/8mkx7fSSYf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 21, 2021
या जमिनी खालसा करण्याचे काम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले. अशी एकूण 513 एकर जमीन खालसा केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. 2017 सालापासून हा उद्योग सुरु असल्याचे ते म्हणाले. 2017 पासून 2020 पर्यंत देवस्थानच्या जमिनी हडप केल्या गेल्या आहेत. या प्रकरणाचा तपास योग्य रीतीने व्हावा यासाठी गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर, त्यांनी यासाठी एसआयटीची नेमणूक केली. एसआयटीने दोन गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले. (हेही वाचा: Devendra Fadnavis On MVA: भ्रष्टाचारानं बरबटलेलं सरकार; सरकारनं लोकशाही बंद केली, फक्त 'रोकशाही' सुरु असल्याचा आरोप - देवेंद्र फडणवीस)
राम खाडे यांनी गृह, महसूल आणि ईडीकडे या दहा प्रकरणांची तक्रार दाखल केली आहे. मच्छिंद्र मल्टिस्टेट को.ऑ.सोसायटीचा सहभाग या घोटाळ्यात आहे. या सर्व जागा खालसा करत असताना या कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून जे बगलबच्चे तयार करण्यात आले त्यांच्या खात्यात पैसे गेले. काही दिवसांपूर्वी ईडीच्या माध्यमातून बातमी पेरली होती की, वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर छापेमारी झाली आहे. आम्ही त्यावेळीच पत्रकार परिषद घेऊन याबाबत कोणतीही छापेमारी झाली नसल्याचा खुलासा केला होता. महाराष्ट्रामध्ये बोर्डाच्या माध्यमातून 11 एफआयआर दाखल केले आहेत.
मंदिर आणि मशीदीच्या जागेवर फेरफार करुन, खासगी नावे चढवून प्लॉटिंग करत ही जमिन विकल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर नांदेड, औरंगाबाद, परभणी, जालना, पुणे, ठाणे आणि बीड जिल्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, अशी माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी दिली.