नागपूर-मुंबई (Nagpur-Mumbai)दरम्यान निर्माण होत असलेल्या समृद्धी द्रुतगती मार्गाच्या (Samruddhi Mahamargs) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. नागपूर ते सेलू बाजार हा 210 किलोमीटरचा पहिला पॅच 2 मे पासून खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनाची तयारी सुरू होती. एमएसआरडीसीच्या म्हणण्यानुसार समृद्धी महामार्गावर नागपूरपासून 15 किलोमीटरवर वन्यजीव ओव्हरपासचे काम सुरू आहे. अंतिम टप्प्यात सुरू असलेले हे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र काही तांत्रिक व आकस्मिक कारणांमुळे आर्च स्ट्रीपमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी तयार केलेल्या मार्गाला (ओव्हरपास) हानी पोहोचली असून त्याच्या दुरुस्तीसाठी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. वाइल्डलाइफ ओव्हरपास पूर्ण झाल्याशिवाय एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी खुला केला जाणार नाही. यामधील सोळाव्या नंबरचा ओव्हरपासचा आर्च कोसळला आहे. यामुळे हे काम पुढील पाच-सहा दिवसांत ते काम पूर्ण होणे अशक्य आहे. तसेच तज्ज्ञांनी आता वन्यजीव उन्नत मार्गासाठी नव्या पद्धतीचे सुपर स्ट्रक्चर बनवण्याचे सुचविले आहे.
एमएसआरडीसीचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी सांगितले की, वरील कारणांमुळे समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे. नागपूर ते मुंबई असा संपूर्ण महामार्ग पुढील वर्षी म्हणजेच जून 2023 मध्ये खुला केला जाणार आहे. समृद्धी महामार्गाचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा एका अधिकाऱ्याने केला आहे. काम वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 मे रोजी पहिल्या टप्प्यातील मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना हिरवा झेंडा दाखवणार होते.
दरम्यान, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग 701 किमी लांबीचा आहे, तर महामार्गाची रुंदी 120 मीटर आहे. महामार्गावर आठ लेनचे काम सुरू आहे. समृद्धी महामार्ग राज्यातील 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांमधून जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 24 जिल्हे एकमेकांशी जोडले जातील. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हा प्रवास अवघ्या 8-9 तासांत पूर्ण करता येणार आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेतीला फटका)
गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र विधिमंडळात मांडण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार या प्रकल्पावर 25,165.34 कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर प्रकल्पाची एकूण किंमत 55,335.34 कोटी रुपये आहे. या महामार्गावर स्वयंचलित टोलवसुली यंत्रणाही बसवण्यात येणार आहे.