Untimely Rain in Maharashtra: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेतीला फटका
Rain | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पाठीमागील काही दिवसांपासून राज्यात वातावरण बदलाचे मोठे परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा मुक्काम वाढतो आहे. ज्याचा फटका राज्यातील शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसताना दिसत आहे. आताही राज्यात अवकाळी पावसाची अवकृपा सुरुच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतमालाचे मोठेच नुकसान झाले आहे. प्रामुख्याने कोकणामध्ये अंबा, फण, काजू, कोकम, करवंद, जांभूळ अशा पिकांना तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात द्राक्षे, कांदा पिकाला अधिक दणका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतमालाला मिळणाऱ्या अनिश्चित दरामुळे शेतकरी आगोदरच चिंतेत असतो. त्यातच जर अशा प्रकारे अवकाळी पावसाचे संकट शेतीवर आल्यास शेतकरी अधिकच कोलमडून जातो.

अवकाळी पावसामुळेच केवळ शेतीचे नुकसान होते असे नाही. अवकाळी पाऊस येण्यापूर्वी आणि येऊन गेल्यानंतरही त्याचे दीर्घकालीन पडसाद शेतपीकांवर पाहायला मिळतात. पावसापूर्वी आणि पाऊस पडून गेल्यानंतर हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होतात. त्यामुळे शेतपीकांवर मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या रोगांचा परिणाम होतो. परिणामी शेतकऱ्याला वारंवार औषध फवारणी करावी लागते. इतके करुनही पीक हाताला येईल याची काहीच शाश्वती नसते. त्यामुळे आगोदरच आतबट्ट्यात असलेला शेतकरी आणखीच आर्थिक अडचणीत गर्तेत ढकलला जातो.

अवकाळी पावसाचा मारा झाल्याने शेतमालाचे मोठे नुकसान होते. जसे की, द्राक्ष पिकांवर थेट परीणाम होऊन त्याची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे जे शेतकरी आपली द्राक्षे निर्यात करतात त्या मालाचा उठाव होत नाही. स्थानिक किंवा भारतीय बाजारपेठेत निर्यात होणारी द्राक्षे हव्या त्या किमतीला खपत नाहीत. द्राक्षाला पर्याय म्हणून काही शेतकरी बेदाना (मनुके) तयार करतात. परंतू, अवकाळी पाऊस आल्यावर किंवा आकाशात ढग जरी दाटून आले तरी आद्रता वाढते. त्यामुळे हवेतील पाणी शोशून हा बेदाना परत फुगतो. परिणामी शेतकऱ्याचे इथेही नुकसान होते. कोकणातील शेतकऱ्याचीही वेगळी स्थिती नाही. तिथल्याही शेतमालाला मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याने त्याचे दीर्घकालीन परिणाम जाणवतात.